चीनचे नियंत्रण रेषेवर ६० सहस्र सैन्य तैनात आणि भारताचे प्रत्युत्तर !
१. भारतापासून रक्षण करण्यासाठी चीनने नियंत्रण रेषेवर अधिक प्रमाणात सैन्य तैनात करणे आणि पेगाँग त्सो सरोवरावर सैनिकी कारवाई म्हणून पूल बांधणे
‘चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या भूभागासमोर ६० सहस्र सैन्य तैनात केले आहे. यामागे भारताने आपल्यावर आक्रमक कारवाई केली, तर सीमेचे रक्षण करता यावे, ही भीती आहे. यापूर्वी तेथे चीनचे एवढे सैन्य कधीच तैनात नव्हते. चीनने हे सैन्य भारतावर आक्रमण करण्यासाठी नाही, तर भारताने आक्रमण केल्यास त्यापासून रक्षण करण्यासाठी ठेवले आहे. चिनी सैन्य एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हलवण्यासाठी चीन लडाखच्या दौलत बेग गोल्डी समोर एक रस्ता बांधत आहे, तसेच लडाखमध्ये पेगाँग त्सो सरोवरावर एक मोठा पूलही बांधत आहे. हे सरोवर १३० ते १४० किलोमीटर लांब आहे आणि २ ते ३ किलोमीटर रुंद आहे. या सरोवराचा ३३ टक्के भाग भारताच्या आणि ६६ टक्के भाग हा चीनच्या कह्यात आहे. पेगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडे असलेले सैन्य उत्तरेकडे आणि उत्तरेकडील सैन्य दक्षिणेकडे नेण्यासाठी चीन हा पूल बांधत आहे. हीदेखील एक सैनिकी कारवाईच आहे. लढाई झाली, तर भारतीय हवाई दल हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हा पूल नक्कीच उद्ध्वस्त करू शकते.
२. चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांची भौगोलिक नावे पालटून भारतावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे
२१ डिसेंबर २०२१ या दिवशी चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांची भौगोलिक नावे पालटून त्यांना चिनी नावे दिली आहेत. वास्तविक चीनचा हा अतिशय पोरकटपणा आहे; कारण त्याने ही नावे पालटली, तरी ती नकाशावर पालटणार नाहीत आणि त्याचा जगावर काहीही परिणाम होणार नाही.
एवढेच काय, या ठिकाणांना चिनी नावे दिल्याने ते चीनच्या कह्यात जाणार नाहीत. या भागात खिंडी, डोंगर आणि रस्ते आहेत. त्यांची नावे पालटल्याने त्यावरील भारताचा ताबा पालटला जाणार नाही. ‘आता आम्ही नावे पालटली, म्हणजे हा भाग आमचाच आहे’, असा मानसिक दबाव टाकण्याचा चीनचा हा प्रयत्न आहे. चीनच्या या कारवाईमुळे भारत सरकार आणि सैन्य यांवर काहीच परिणाम होत नाही; परंतु काही देशभक्त नागरिक निश्चित अस्वस्थ होतात. त्याला भारतही चीनच्या कह्यात असलेल्या तिबेटी ठिकाणांना आपली नावे देऊन प्रत्युत्तर देऊ शकतो.
३. चीनला लढाईचा अनुभव नसल्याने तो भारताच्या विरोधात पारंपरिक लढाई करू न शकणे
चीनचे भारताच्या विरोधात पारंपरिक लढाई करण्याचे धाडस नाही. चिनी सैन्य शेवटची लढाई वर्ष १९७९ मध्ये व्हिएतनामच्या विरोधात लढले होते. तेव्हापासून चिनी सैन्याला लढाईचा अनुभव नाही. आता जानेवारीचा मास चालू आहे. या काळात बर्फ पडल्याने खिंडी बंद झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कुठलेही पारंपरिक युद्ध होऊ शकत नाही. त्यामुळे चीनने लडाखमध्ये कितीही सैन्य तैनात केले, तरी त्याचा वापर लढाईसाठी होऊ शकत नाही. त्याला लढाई करायची असेल, तर ती एप्रिल-मे मासामध्ये होऊ शकते; कारण तेव्हा बर्फ काही प्रमाणात न्यून झालेला असेल.
४. नियंत्रण रेषेवर चीनप्रमाणे भारतानेही पायाभूत सुविधांसह सैन्याची विविध प्रकारे सिद्धता करणे !
भारतही नियंत्रण रेषेवर जय्यत सिद्धता करत आहे. अलीकडेच भारताने ‘राष्ट्रीय रायफल्स’ची एक बटालियन लडाखमध्ये तैनात केली आहे. या ठिकाणी सैन्याच्या केवळ २ तुकड्या तैनात होत्या; पण आता तेथे सैन्याचे बळ पुष्कळ वाढवण्यात आले आहे. राष्ट्रीय रायफल्सच्या तुकड्या या आतंकवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी काश्मीरमध्ये असतात; पण आता तेथील आतंकवाद न्यून झाल्याने हे सैन्य लडाखमध्ये आणण्यात आले आहे.
या भागात जेवढे रस्ते गेल्या २५ वर्षांत बांधले गेले नव्हते, त्याहून अधिक रस्ते गेल्या २-३ वर्षांमध्ये बांधण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय सैन्याची हालचाल वेगाने करणे शक्य आहे. सैन्याला लागणारे साहित्य, रसद, त्यांची वाहने सीमेवर सहजपणे जाऊ शकतात. पूर्वी जेथे पोचायला ५ – ६ दिवस लागायचे, आता तेथे केवळ २४ घंट्यांच्या आत सैन्य पोचू शकते. पूर्वी लडाखमध्ये जाण्यासाठी एकच रस्ता होता. तो श्रीनगर, जोझिला, द्रास आणि कारगिलमधून लेह येथे जायचा. हा रस्ता ६ मास खुला आणि ६ मास बर्फामुळे बंद रहायचा. याखेरीज भारताने हिमाचलच्या बाजूने २ नवीन रस्ते बांधले आहेत. त्यामुळे लेहमध्ये १२ घंट्यांच्या आत पोचता येते. भारतही रस्ते बांधणे, विमानतळे बांधणे, सैन्याचे आधुनिकीकरण करणे, लढाईसाठी आक्रमक सैन्य उभारणे, सीमेवर सैन्य वाढवणे अशा प्रकारची सर्व सिद्धता करत आहे. त्यामुळे पारंपरिक युद्ध झाले, तर आपण त्याची चिंता करू नये.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
५. चीनच्या ‘हायब्रिड’ युद्धाच्या विरोधात भारताने अधिक सिद्धता करून वेळोवेळी प्रत्युत्तर देणे आवश्यक !
चीनमध्ये भारताच्या विरोधात पारंपरिक युद्ध करण्याचे धाडस नाही. त्यामुळे तो अपारंपरिक युद्ध, म्हणजे ‘हायब्रिड वॉर’ (विरोधी देशांमध्ये सामाजिक द्वेष वाढवणे, आर्थिक विकासात अडथळा निर्माण करणे, विविध प्रणालींना धोका पोचवणे, राजकीय नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणे) लढतो आहे. यामध्ये आर्थिक युद्ध, नक्षलवाद्यांना साहाय्य करणे, ईशान्य भारतात आतंकवाद पुनरुज्जीवित करणे, सायबर आक्रमणे, घातपाताचा वापर करणे, तांत्रिक स्तरावर भारताला त्रास देणे, शेजारी राष्ट्रांमध्ये घुसून भारताला घेरणे अशा कारवायांचा समावेश आहे. देशाला पारंपरिक युद्धाची काळजी नाही; कारण चीनचे आक्रमण परतवून लावण्यासाठी आणि त्यांच्यावर आक्रमण करण्यासाठी भारताची सिद्धता चांगली आहे; पण आपण हायब्रिड वार, सायबर वॉर (संगणक आणि इंटरनेट यांच्या साहाय्याने करण्यात येणारे आक्रमण) अन् आर्थिक युद्ध यांविरोधात अधिक चांगली सिद्धता करून चीनला वेळोवेळी प्रत्युतर दिले पाहिजे. भारताने याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. या लढाईत देशभक्त नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. भारतियांनी चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार घालणे आवश्यक आहे.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.