दुकानदार आणि विक्रेते यांना १० रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश द्यावेत !
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष घालून दुकानदार आणि विक्रेते यांना का सांगत नाही ? – संपादक
सातारा, १६ जानेवारी (वार्ता.) – भारतीय रिझर्व्ह बँकेने १० रुपयांची सर्व प्रकारची नाणी स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत; मात्र अनेक अफवा आणि अपसमज यांमुळे दुकानदार आणि विक्रेते नाणी स्वीकारण्याचे टाळतात, तसेच नोट देण्याविषयी ग्राहकांची अडवणूक करतात. असे दुकानदार आणि विक्रेते यांना १० रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या वतीने अव्वल कारकून अमोल भिसे यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी ‘सुराज्य अभियाना’चे श्री. राजेंद्र सांभारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते.
निवेदनामध्ये म्हटले आहे,
१. भारतीय चलन पद्धतीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १४ प्रकारची १० रुपयांची नाणी चलनात आणली आहेत, तसेच ही नाणी वैध असल्याचे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीपत्रकांद्वारे कळवले आहे. १७ जानेवारी २०१८ या दिवशी रिझर्व्ह बँकेने नाणी स्वीकारण्याविषयी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. तरीही ग्राहकांची अडवणूक होते. १० रुपयांची नाणी न स्वीकारणार्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे निर्देशही रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास संबंधितांना शिक्षा करण्याचेही प्रावधान आहे.
२. रिझर्व्ह बँकेने १० रुपयांची नाणी स्वीकारण्याचे दिलेले आदेश आपण सर्व दुकानदार, विक्रेते आणि संबंधित यांपर्यंत पोचवावेत. आपणही तसे आदेश निर्गमित करावेत आणि ग्राहक अन् नागरिक यांची गैरसोय दूर करावी.
३. याविषयी नागरिकांचे जे अधिकार आहेत त्याविषयी त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, स्थानिक केबल नेटवर्क, फलक, प्रसिद्धीपत्रक आदी माध्यमांतून व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करावी.