मुंबईतील ‘धारावी’ गड झाला आहे मद्यपी आणि तृतीयपंथी यांचा अड्डा : संरक्षित स्मारकाचा दर्जा केवळ नावापुरता !
|
‘पुरातत्व विभाग प्राचीन गड-दुर्गांचे जतन करण्यासाठी आहे कि ते नष्ट करण्यासाठी ?’, असा कुणालाही प्रश्न पडेल. या विभागाची दुःस्थिती पालटण्यासाठी सरकार आता तरी पावले उचलणार का ? – संपादक
मुंबई, १६ जानेवारी (वार्ता.) – ‘काळा किल्ला’ म्हणून ओळखला जाणारा धारावीतील ‘धारावी’ हा गड केवळ नावाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ राहिला आहे. सद्यःस्थितीत या गडाचा उपयोग मद्य पिणे, चरस, गांजा ओढणे यांसाठी होत असून गडावर दिवसाढवळ्या हे प्रकार चालू आहेत. गडावर मद्याच्या बाटल्यांचा खच पडला आहे. पुरातत्व विभाग आणि आजपर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे या गडाचे ऐतिहासिक स्वरूप नष्ट झाले असून हा गड म्हणजे मद्यपी आणि तृतीयपंथी यांचा अड्डा बनला आहे.
धारावीचा गड हा मिठी नदीच्या पात्रात आहे. गडाच्या एका भिंतीवर ‘सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष आणि गव्हर्नर ऑनरेबल हॉर्न यांनी वर्ष १७३७ मध्ये बांधला’, अशी इंग्रजी अद्याक्षरात पाटी लिहिलेली आहे. हा किल्ला नदीच्या पात्रात असला, तरी सद्यःस्थितीत पात्रात भराव टाकून गडाच्या चारही बाजूला झोपडपट्टी आणि घरे बांधण्यात आली आहेत. हा गड सर्व बाजूंनी झोपडपट्टीने वेढल्यामुळे ‘येथे गड आहे’, हेच लक्षात येत नाही. गडावर चढण्यासाठी मार्ग नाही. गडावर चढण्यासाठी लोखंडी पायर्यांची शिडी करण्यात आली आहे. गडाची एकंदरीत दुरवस्था पाहिल्यास ‘पुरातत्व विभागाने हा गड मद्यपी आणि तृतीयपंथी यांच्यासाठी सोडून दिला आहे का ?’ असा प्रश्न पडतो.
(सौजन्य : Lokmat Sakhi)
मद्य पिण्यासाठी आणि खासगी कामांसाठी होत आहे गडाचा वापर !
गडावर प्राचीन विहीर आहे; मात्र त्यात प्लास्टिक, कचरा आदी टाकल्याने ती घाणीने भरून गेली आहे. सध्या विहिरीवर ‘ग्रील’ (लोखंडी जाळीचे झाकण) बसवण्यात आले आहे. गडाच्या एका कोपर्यात कोंबड्यांसाठी खुराडा बांधण्यात आला आहे. गडावर चुली आणि त्यात जळकी लाकडे ठिकठिकाणी पहायला मिळतात. ‘यावरून तेथे मद्यपान आणि मांस शिजवून मेजवान्या होत असाव्यात’, असे सांगितले जाते. गडावरच मूत्रविसर्जन करणे आदी सर्व प्रकारांमुळे गडाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मद्याच्या मेजवान्या करण्यासाठी, तसेच खासगी कामांसाठी सध्या गडाचा वापर होत आहे.
पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे गडाची दुरवस्था !
काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाकडून गडाची डागडुजी करण्यात आली होती. गडांच्या भिंतींना प्लास्टर करण्यात आले आहे; मात्र गडाभोवती झालेल्या अतिक्रमणाकडे पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत गड सर्व बाजूंनी अतिक्रमणाने वेढला असून त्याचे ऐतिहासिक स्वरूप नष्ट झाले आहे. गडाची माहिती देणारा कोणताही फलक किंवा पुरातत्व विभागाच्या नावाची पाटी गडाच्या परिसरात लावण्यात आलेली नाही. ‘पुरातत्व विभाग आणि सरकार यांनी वेळीच लक्ष दिले असते, तर गडाच्या बाजूचे अतिक्रमण आणि दुरवस्था टाळता आली असती’, असे बोलले जात आहे.
धारावी गडाविषयीची माहितीया गडाचा परिसर अतिशय छोटा असला, तरी खाडीवरून शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हा बांधण्यात आला होता. तोफा डागण्यासाठी येथे मध्ये मध्ये खिडक्यांसारख्या चौकटी निर्माण केल्या आहेत. शीव आणि धारावी या दोन परिसरात ‘संरक्षणाच्या दृष्टीने तळ हवा’, म्हणून पोर्तुगिजांनी हा गड बांधला होता. काही वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने येथे रंग देऊन डागडुजी केली होती. |