बनावट गुन्ह्यात ३ युवकांना अडकवून पैसे उकळल्याप्रकरणी सालेकसा (गोंदिया) येथील ५ पोलीस निलंबित !
अशी बनावट कारवाई करणार्या उत्तरदायी पोलिसांना आजन्म कारागृहात टाका ! – संपादक
गोंदिया – जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील ३ युवकांना अवैध मद्यविक्रीच्या बनावट गुन्ह्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी १५ जानेवारी या दिवशी ५ पोलिसांचे निलंबन केले आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक धाबळे, पोलीस नाईक प्रमोद सोनवणे, पोलीस नाईक अनिल चक्रे, पोलीस शिपाई संतोष चुटे आणि मधू सोनी, अशी त्यांची नावे आहेत.
सालेकसा पोलीस ठाण्यातील वरील ५ पोलिसांनी वर्ष २०२१ मधील डिसेंबर मासाच्या प्रारंभी देशी मद्य पकडले होते. मद्यांच्या काही पेट्या या पोलीस नोंदवहीत दाखवण्यात आल्या होत्या, तसेच मद्याच्या ८ पेट्या पोलिसांनी त्यांच्या ओळखीचे युवक विशाल दासरिया, दीपक बासोने आणि भूषण मोहरे यांच्याकडे काही दिवसांसाठी ठेवण्यास दिले होते. यातील विशाल यांनी स्वतःच्या शेतात मद्याच्या पेट्या लपवून ठेवल्या. २-३ दिवसांनी पोलिसांनी विशाल यांना दूरभाष करून एका अनोळखी व्यक्तीला पाठवून ८ मद्यांच्या पेट्यांपैकी २ पेट्या मद्य देण्यास सांगितले.
विशाल यांनी त्या व्यक्तीला २ पेट्या मद्य दिले. ती व्यक्ती जाताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून ६ पेट्या मद्य जप्त करून विशाल यांना मारहाण केली आणि वर त्यांच्यावर अवैध मद्यविक्रीचा आरोप लावून गुन्हा नोंद केला. युवकांनी पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे कुणी ऐकले नाही. पोलिसांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. (अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्हणता येईल का ? – संपादक) या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी युवकांनी गृहमंत्री, मानवाधिकार आयोग आणि पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहिले. या प्रकरणाची माहिती देऊन न्यायाची मागणी केली. अखेर पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर नोंद घेऊन वरील कारवाई केली.