२४ जानेवारीला नवी मुंबई विमानतळाचे काम बंद करण्याचा प्रकल्पग्रस्तांचा निर्धार !
पनवेल – नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव राज्य सरकारने घेतला नाही, तर २४ जानेवारीला विमानतळाचे ‘काम बंद’ आंदोलन करण्याची चेतावणी येथील प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे. माजी खासदार दि.बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त पनवेल तालुक्यातील प्रकल्पग्रस्त कोल्ही कोपर गावात आयोजित ‘भूमीपुत्र निर्धार परिषदे’त याविषयीचा निर्णय घेण्यात आला आहे.
या वेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, नवी मुंबई विमानतळावरून विमान उडवायचे असेल, तर या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावेच लागेल. राज्यात मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा हवा, यासाठी शिवसेना अडून बसली होती. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त अडून बसले आहेत. माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, २७ गाव प्रकल्पग्रस्त समितीचे नेते, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
प्रशांत ठाकूर म्हणाले की, सिडकोने केलेल्या अन्यायाची चीड प्रकल्पग्रस्तांच्या मनात आहे. सिडको प्रशासन पोलिसांच्या साहाय्याने आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. विमानतळाच्या नामकरणासाठी राज्य सरकार आणि सिडको प्रशासन कान बंद करून बसले आहे. राज्य सरकार दि.बा. पाटील यांच्या नामकरणाचा ठराव मांडत नाही, तोपर्यंत प्रकल्पग्रस्त शांत बसणार नाहीत. दि.बा. पाटील यांचे विमानतळाला नाव असणे, हा भूमीपुत्रांच्या अस्मितेचा प्रश्न आहे.