जन्मतः विकलांग असलेले आणि कोरोना महामारीचे संकट, तसेच स्थूलातील अन् सूक्ष्मातील आक्रमणे यांतही गुरुकृपेने रक्षण झालेले सनातनचे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी !
जन्मतः विकलांग असलेले आणि कोरोना महामारीचे संकट, तसेच स्थूलातील अन् सूक्ष्मातील आक्रमणे यांतही गुरुकृपेने रक्षण झालेले सांगली येथील सनातनचे ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी (वय ३२ वर्षे) !
आज पौष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१६.१.२०२२) या दिवशी सांगली येथील सनातनचे ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी यांचा ३२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने वर्ष २०२० मध्ये पू. संकेत कुलकर्णी यांच्यावर झालेल्या स्थूलातील आणि सूक्ष्मातील आक्रमणांमुळे त्यांना झालेले त्रास येथे दिले आहेत.
पू. संकेत गुरुदास कुलकर्णी यांना ३२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. कोरोना महामारीची झळ न लागणे
‘मार्च २०२० पासून दळणवळण बंदीमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक आमच्याकडे येणे बंद झाले. तेव्हा आम्हाला ‘सर्वच थांबले आहे’, असे वाटले. हा काळ सर्वांनाच पुष्कळ कठीण होता; पण कोरोनासारख्या महाभयंकर रोगाची झळच काय; पण गुरुकृपेने आमच्यावर त्याची सावलीही पडली नाही. तेव्हा आमच्या जवळचे, शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवारातील लोकांचे एकेक प्रसंग ऐकणेही पुष्कळ अवघड वाटत होते.
२. पू. संकेतदादांवर स्थुलातून आणि सूक्ष्मातून पुष्कळ आक्रमणे होत असल्याने त्यांनी पुष्कळ चिडचिड करणे आणि त्यांचा त्रास न्यून होण्यासाठी त्यांच्या आईने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आर्ततेने प्रार्थना करणे
मार्च २०२० मध्ये पू. संकेतदादांवर स्थुलातून आणि सूक्ष्मातून पुष्कळ आक्रमणे होत होती. बर्याच वेळा मला (आईला) त्यांच्या अवतीभोवती सूक्ष्मातून मोठ्या वाईट शक्ती दिसायच्या. त्या कालावधीत मी पू. संकेतदादांना खायला देण्यासाठी किंवा त्यांचे कपडे पालटण्यासाठी त्यांच्याजवळ गेल्यावर ते मला जवळ येऊ देत नसत. ते एकटेच एका कोपर्यात घंटोन्घंटे बसून रहात. त्यांची सतत चिडचिड होत असे. ते क्षणात हसायचे, तर क्षणात चिडायचे. त्यांची सतत पालटणारी स्थिती पाहून ‘मला काय करावे ?’, हे मला कळत नसे. मी शरणागतभाव ठेवून गुरुदेवांना प्रार्थना आणि त्यांचा धावा करत असे.
३. पू. संकेतदादांना होणार्या त्रासाचे स्वरूप पालटून त्यांना पुष्कळ प्रमाणात शारीरिक त्रास होणे
त्यानंतर पू. संकेतदादांना होणार्या त्रासाचे स्वरूप पालटले. त्यांना ‘अपचनामुळे पोट बिघडणे आणि उलट्या होणे’, असा त्रास होऊ लागला. त्यांना पाणीही पचेना. इतर वेळी त्यांना ‘एनिमा’ दिल्यावरच त्यांचे पोट साफ व्हायचे; परंतु अपचनाच्या त्रासामुळे दिवसांतून ८ – १० वेळा त्यांचे कपडे पालटावे लागायचे. ६ – ७ मास हे त्रास अल्प-अधिक प्रमाणात होत राहिले.
४. पू. दादांवर वैद्यांनी संजीवन उपचार (सप्तचक्रांना शक्ती पुरवणे) चालू करणे; परंतु ते उपचार करणार्या वैद्यांनाच पू. दादांकडून शक्ती मिळणे
आमच्याकडे पू. संकेतदादांवर संजीवन उपचार (सप्तचक्रांना शक्ती पुरवणे) करण्यासाठी एक वैद्य येत होते. त्या उपचारांनी ‘पू. संकेतदादांना बरे वाटले’, असे आम्हाला वाटले. प्रत्यक्षात त्या वैद्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘पू. संकेतदादांची वरची चक्रे अधिक शक्तीशाली आहेत; पण मूलाधारचक्र कमकुवत आहे. त्यामुळे त्यांच्यात असंतुलन आहे. त्यांच्याभोवती पुष्कळ पुण्यात्मे आहेत. त्या बळावर त्यांनी आजपर्यंत पुष्कळ गोष्टी सहन केल्या आहेत. मी त्यांच्यावर संजीवन उपचार करत आहे; पण मलाच त्यांच्याकडून शक्ती मिळत आहे.’’
५. त्रास वाढल्याने पू. संकेतदादांनी आहार अल्प घेणे, सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपाचे उपाय केल्यावर त्रास उणावणे
त्यानंतर पू. संकेतदादांचा त्रास वाढल्याने ते केवळ फळे आणि सरबत घेत होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. या कालावधीत त्यांना असह्य पोटदुखी होत असावी. त्यामुळे त्यांचा चिडचिडेपणा वाढला होता. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आम्हाला सांगितले, ‘‘पू. संकेतदादांवर पुष्कळ आवरण आले असून त्यांनी ३ घंटे नामजप करायला हवा.’’ तो नामजप मी आणि माझे यजमान (श्री. गुरुदास कुलकर्णी) दोघे मिळून करत होतो. त्यानंतर पू. संकेतदादांमध्ये हळूहळू पालट होत होते.
६. पू. संकेतदादांना अधून-मधून अपचनाचा त्रास होत रहाणे, तेव्हा पुन्हा नामजपाचे उपाय करणे, हे सर्व करण्यासाठी गुरुदेवच बळ देत असल्याचे जाणवणे
पू. संकेतदादांना पुनःपुन्हा अपचनाचा त्रास होत होता. आम्ही त्यांच्यावरील आवरण काढत होतो. आम्ही पू. संकेतदादांसाठी नामजप करतांना आमच्यावरील आवरण न्यून होत होते. नामजप करतांना आम्हाला चांगले वाटत होते आणि त्यामुळे त्यांच्या प्रकृतीतही पालट झाला; पण २ – ३ मासांनंतर पुन्हा अकस्मात् त्यांचे पोट बिघडले. त्या वेळीही नामजप, प्रार्थना करणे, इत्यादी उपाय सातत्याने आणि प्रयत्नपूर्वक करत राहिलो. हे सर्व प्रयत्न गुरुदेवच करवून घेत होते.
७. पू. संकेतदादांचा शारीरिक त्रास वाढल्यावर रुग्णालयात भरती करणे आणि गुरुकृपेने ५ – ६ दिवसांत त्यांची प्रकृती बरी होणे
नंतर पू. संकेतदादांना ‘युरीन इन्फेक्शन’ झाले आणि त्यांचे पोटही बिघडले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. दळणवळण बंदी असल्याने आम्ही कुणाला बोलावू शकलो नाही. त्या ५ – ६ दिवसांत पू. संकेतदादांना ४ ‘सलाईन’च्या बाटल्या लावाव्या लागल्या. ‘सलाईन’मधूनच त्यांना ‘इंजेक्शने’ दिली. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत पालट झाला.
तेव्हा माझीही प्रकृती बरी नसल्याने मला ‘घर आणि रुग्णालय दोन्ही कसे सांभाळणार ?’, असा प्रश्न होता. तरी ‘आम्ही हे सर्व करू शकलो, हीच माझ्यासाठी मोठी गुरुकृपा होती’, असे मला वाटते.
८. आईकडून चूक झाल्यावर पू. संकेतदादांनी प्रायश्चित घेणे
एकदा पू. संकेतदादांची अंघोळ झाल्यानंतर मी ‘गिझर’ बंद करायला विसरल्याने तो बराच वेळ चालू राहिला. ही चूक मी पू. संकेतदादांना सांगितल्यावर त्यांनी ४ दिवस चहा, न्याहारी आणि दुपारचे जेवण न घेणे, असे प्रायश्चित्त घेतले.
‘हे गुरुमाऊली, संतसेवा करण्याचे, त्यांच्याविषयी लिखाण करण्याचे आमच्यात बळ नाही. ही सेवा आपणच आमच्या माध्यमातून करवून घेत आहात, त्यासाठी कृतज्ञता !’
– सौ. सुजाता गुरुदास कुलकर्णी, सांगली (२.१.२०२२)
(क्रमशः उद्याच्या अंकात)
उर्वरित भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –
सांगली येथील सनातनचे संत पू. संकेत कुलकर्णी यांच्यासाठी नामजप करतांना त्यांच्या आईला झालेले त्रास !
https://sanatanprabhat.org/marathi/544424.html
|