चार हुतात्मा स्मारकाचे नुतनीकरण आणि सुशोभीकरण करून चौकास ‘चार हुतात्मा चौक’ असे नाव द्यावे !
चार हुतात्मा स्मारक निर्माण कृती समितीची मागणी
सोलापूर, १४ जानेवारी (वार्ता.) – शहरातील चार हुतात्मा स्मारकाचे नुतनीकरण आणि सुशोभीकरण करून त्या चौकास ‘चार हुतात्मा चौक’, असे नाव देण्यात यावे, तसेच त्यांच्या जीवन चरित्राचा परिचय सर्वांना व्हावा यासाठी फलक लावण्यात यावेत, या मागण्यांचे निवेदन चार हुतात्मा स्मारक निर्माण कृती समितीच्या वतीने प्रशासन आणि लोकप्रतीनिधी यांना देण्यात आले.
महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, महापालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम्, स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख, उत्तर विभागाचे आमदार विजयकुमार देशमुख यांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष आनंद (भाऊ) मुसळे, खजिनदार शितल परदेशी, सचिव संतोष वेदपाठक, उपाध्यक्ष शिवशंकर अंजनाळकर, सुबोध धामणगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सोलापूरचा स्वातंत्र्यसंग्राम ठळकपणे उठून दिसणारा आहे. १२ जानेवारी हा दिवस बलीदान दिवस म्हणून ओळखला जातो. १२ जानेवारी १९३१ या दिवशी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या देशभक्तांना इंग्रजांनी फासावर चढवले होते. सध्या पार्क चौकातील चार हुतात्मा स्थळास ‘चार पुतळा’, असे संबोधले जाते, ही खेदाची गोष्ट असून त्या ठिकाणची दैनंदिन देखभालही व्यवस्थित होत नाही.