कराड येथे नागरिकांना पुन्हा दिवसातून २ वेळा पाणीपुरवठा होणार !
कराड, १४ जानेवारी (वार्ता.) – शहरातील पाणीपुरवठा करण्याकामी कराड नगरपालिकेस तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिवसातून २ वेळा होणारा पाणीपुरवठा ११ जानेवारीपासून एक वेळ करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र कराडवासियांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पालिका प्रशासनाला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच नागरिकांना दिवसातून २ वेळा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाण्याची नासाडी करणारे आणि नळाला मोटार लावल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करून मोटार शासनाधीन करण्यात येईल. शहरातील काही ठिकाणी पालिकेचा निषेध व्यक्त करणारे ‘फ्लेक्स बोर्ड’ अज्ञातांकडून लावण्यात आले होते, तसेच सामाजिक माध्यमांतून पालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले होते. याची नोंद घेत पालिका प्रशासनाने पूर्वीप्रमाणेच दिवसातून २ वेळा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे; मात्र त्यामध्ये दोन्ही वेळा १ घंट्याऐवजी ४५ मिनिटेच पाणी सोडण्यात येणार आहे; म्हणजे दोन्हीवेळी २५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली आहे.
पाण्याची नासाडी करणारे आणि नळाला मोटार लावणार्यांवर कारवाई करणार !यापुढे आठवड्यातील २४ घंटे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मीटर रिडिंगप्रमाणे शुल्क द्यावे. हे शुल्क प्रतिमास आकारण्यात येणार असून त्याविषयी नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून या शुल्क आकारणीस प्रारंभ होणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे. |