पौष मासातील (१६.१.२०२२ ते २२.१.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘३.१.२०२२ या दिवसापासून पौष मास चालू झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, हेमंतऋतू, पौष मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे. १८.१.२०२२ या दिवसापासून कृष्ण पक्ष चालू होणार आहे.

 

(साभार : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

२ अ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’, असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. १६.१.२०२२ या दिवशी उत्तररात्री ३.१९ पासून १७.१.२०२२ या दिवशी सायंकाळी ४.२२ पर्यंत विष्टी करण आहे, तसेच २०.१.२०२२ या दिवशी रात्री ८.३२ पासून २१.१.२०२२ या दिवशी सकाळी ८.५२ पर्यंत विष्टी करण आहे.

सौ. प्राजक्ता जोशी

२ आ. माघस्नानारंभ : सूर्याेदयकाली असलेल्या पौष पौर्णिमेच्या दिवशी माघस्नानारंभ होतो. दोन दिवशी सूर्याेदयकाली पौर्णिमा तिथी असल्यास दुसर्‍या दिवशी माघस्नान आरंभ करतात. पौष पौर्णिमेला चंद्र ग्रह पुष्य नक्षत्रात असल्याने या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान केल्याने विशेष लाभ होतो. तीर्थक्षेत्री स्नान करणे शक्य नसल्यास पवित्र नद्यांचे स्मरण करून स्नान करावे. १७.१.२०२२ या दिवशी सूर्याेदयकाली पौष पौर्णिमा तिथी आहे.

२ इ. शाकंभरी पौर्णिमा : पौष शुक्ल अष्टमी तिथीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरीदेवीचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाची समाप्ती पौष मासातील उदयव्यापिनी पौर्णिमेला होते; म्हणून या पौर्णिमेला ‘शाकंभरी पौर्णिमा’, असे म्हणतात. या दिवशी देवीला अनेक भाज्यांचा (शाक) नैवेद्य दाखवला जातो. १७.१.२०२२ या दिवशी शाकंभरी पौर्णिमा आहे.

२ ई. कुंभायन : २०.१.२०२२ या दिवशी सकाळी ८.०८ मि. नंतर रवि ग्रह सायन पद्धतीनुसार (पाश्चात्य पद्धतीनुसार) कुंभ राशीत प्रवेश करत आहे.

२ उ. संकष्ट चतुर्थी : प्रत्येक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ‘संकष्ट चतुर्थी’ असे म्हणतात. ज्या दिवशी चंद्रोदयसमयी चतुर्थी तिथी असते, त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात; कारण श्री गणपतीच्या या व्रतामध्ये चंद्रदर्शन होणे विशेष महत्त्वाचे आहे. २१.१.२०२२ या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ९.२५ आहे.

२ ऊ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २१.१.२०२२ या दिवशी सकाळी ९.४३ पासून २२.१.२०२२ या दिवशी सकाळी ९.१५ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल शास्त्री, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद आणि हस्तसामुद्रिक प्रबोध), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.१.२०२२)

टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.

टीप २ – भद्रा (विष्टी करण), अन्वाधान, कुलधर्म, इष्टि आणि घबाड मुहूर्त यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.

टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.

१. हरिचिया दासा हरि दाही दिशा ।
भावें जैसा तैसा हरि एक ।। – संत एकनाथ

अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.

२. तुका म्हणे हरिच्या दासा ।
शुभ काळ दाही दिशा ।। – संत तुकाराम

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’
ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’