सरसकट शाळाबंदीच्या निर्णयाला विरोध असून शिक्षणाचे दायित्व कोण घेणार ? – प्रा. सचिन काळबांडे, राष्ट्रीय अध्यक्ष, आर्.टी.ई. फाऊंडेशन
नागपूर – कोरोनाच्या संचारबंदीमुळे ऑनलाईन शिक्षणाच्या उणिवा पुढे येत आहेत. पुन्हा १५ फेब्रुवारीपर्यंत सरसकट शाळा बंद करणे म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात घालणे होय. विद्यार्थी यंदा परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावेत. गुणवत्ता सूचीत आपल्या मेहनतीने नाव यावे, यासाठी अभ्यासाला लागले होते; परंतु अचानक ‘शाळा बंद’चा आदेश आला. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकडून तीव्र अप्रसन्नता व्यक्त होत आहे. सरसकट शाळाबंदीच्या निर्णयाला विरोध असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे दायित्व कोण घेणार ? असे ‘आर्.टी.ई. फाऊंडेशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे यांनी म्हटले आहे.
हा निर्णय सुधारून सरसकट ‘शाळा बंद’चा निर्णय स्थानिक पातळीवर सध्या असलेल्या परिस्थितीनुसार घ्यावा. किमान ५० टक्के उपस्थितीमध्ये शाळा चालू करण्यास तातडीने अनुमती द्यावी, अशी विनंती काळबांडे यांनी १४ जानेवारी या दिवशी राज्य सरकारला केली आहे.