‘ट्विटर’च्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करताच महिला पत्रकाराचे बंद केलेले खाते पूर्ववत् चालू !

काश्मिरी हिंदू असलेल्या पत्रकाराचा ‘ट्विटर’ला दणका !

‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’ याची प्रचीती या प्रकरणात आली. सातत्याने धर्मांध कट्टरतावाद्यांच्या विरोधात बोलणार्‍या हिंदूंची मुस्कटदाबी करणार्‍या ‘ट्विटर’च्या विरोधात अधिकाधिक हिंदूंनी न्यायालयीन लढा देणे अपेक्षित आहे ! – संपादक

काश्मिरी हिंदू आणि पत्रकार आरती टिक्कू

देहली – काश्मिरी हिंदू आणि पत्रकार आरती टिक्कू यांनी गेल्या आठवड्यात ‘ट्विटर’च्या अवैध कारवाईच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. यानंतर ‘ट्विटर’कडून त्यांचे खाते पूर्ववत् चालू करण्यात आले आहे, तसेच उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेली याचिका मागे घेण्याची विनंती केली आहे.

टिक्कू यांनी १५ डिसेंबर या दिवशी स्वतःच्या भावाच्या साहाय्यासाठी एक ‘ट्वीट’ केले होते. यात त्यांनी म्हटले होते, ‘श्रीनगर येथे रहाणारा माझा भाऊ साहिल टिक्कू याला काश्मीरमधील आतंकवादी आणि त्यांचे पाकिस्तान, ब्रिटन अन् अमेरिका येथील प्रमुख यांच्याकडून उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. याकडे कुणी लक्ष देत आहे का ? आम्ही इस्लामवाद्यांकडून मारले जाण्याची वाट पाहिली जात आहे का ? त्यांच्यावर काही कारवाई केली जाणार आहे ?’

हे ‘ट्वीट’ केल्याच्या २ दिवसांनी ‘ट्विटर इंडिया’ने आरती टिक्कू यांचे खाते बंद करत ‘तुम्ही तुमच्या भावाला मिळत असलेल्या धमक्यांची पोस्ट काढून टाकल्यास तुमचे खाते चालू करण्यात येईल’, अशी नोटीस पाठवली होती. यात असेही म्हटले होते, ‘तुम्ही जात, राष्ट्रीयता, लैंगिकता आणि धर्म यांच्या आधारावर लोकांमध्ये हिंसेला प्रोत्साहन देऊ शकत नाही, तसेच धमकी देऊनही लोकांना त्रास देऊ शकत नाही.’

या विरोधात आरती टिक्कू यांनी न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेत ‘ट्विटर’ त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन आणि इस्लामी आतंकवाद्यांची बाजू घेत आहे’, असे म्हटले आहे. ‘ट्विटर’ साम्यवादी आणि इस्लामी कट्टरपंथीय यांचे उदात्तीकरण करत असल्याचा आरोप अनेक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी करतात.