सांगली येथील सनातनचे विकलांग आणि ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी (वय ३२ वर्षे) यांच्यातील चैतन्यामुळे घर, सभोवतालचा परिसर अन् पूर्वजांची छायाचित्रे यांत जाणवलेले चांगले पालट
उद्या पौष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१६.१.२०२२) या दिवशी सांगली येथील सनातनचे ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी यांचा ३२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या आईला पू. संकेत यांच्या चैतन्यामुळे घर आणि सभोवतालचा परिसर यांत जाणवलेले चांगले पालट येथे दिले आहेत.
पू. संकेत गुरुदास कुलकर्णी यांना ३२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. घराभोवती संरक्षककवच निर्माण होणे
१ अ. पू. संकेतदादांमुळे घरातील चैतन्य वाढल्याने घरामध्ये पुष्कळ चांगले पालट जाणवणे : ‘ऑगस्ट २०२० पासून आमच्या घरामध्ये चांगले पालट होत आहेत’, असे मला जाणवते. एखादी खोली बरेच दिवस स्वच्छ केली नाही, तरी तिची स्वच्छता करायला अधिक वेळ लागत नाही. रात्री घरातील सर्व दिवे बंद केल्यानंतर घरात सर्वत्र मंद प्रकाश जाणवतो. घरातील कोपरान्कोपरा प्रकाशतो. घरातील कोणतीही वस्तू स्पष्टपणे दिसते आणि घरातील भांडीही चमकतात. देवाला वाहिलेली फुले ८ दिवस चांगली रहातात. देवतांच्या मूर्तीही प्रकाशमान आणि बोलक्या वाटतात. ‘घराभोवती चैतन्यमय संरक्षककवच निर्माण झाले आहे’, असे मला जाणवते.
१ आ. वसाहतीतील दुसर्या माळ्यावरील एका मुलाने सज्जातून खाली उडी मारणे; मात्र तो पू. संकेतदादांच्या खोलीच्या खिडकीखाली पडून वाचणे, ‘घराभोवती असलेल्या संरक्षककवचामुळे तो मुलगा वाचला’, असे जाणवणे : आमच्या सदनिकेच्या वरच्या माळ्यावर एक कुटुंब भाड्याने रहाते. एके दिवशी दुपारी त्यांच्या मुलाने दुसर्या माळ्यावरून खाली उडी मारली. सुदैवाने तो पू. संकेतदादा झोपतात, त्या खिडकीखाली पडल्याने वाचला. त्याच्या पाठीला थोडीशी दुखापत झाली. या प्रसंगावरून ‘आमच्या घराभोवती असलेल्या सूक्ष्म संरक्षककवचामुळेच तो मुलगा वाचला’ असे मला जाणवले.
१ इ. घरातील चैतन्यामुळे वाईट शक्तींचे त्रास उणावणे आणि तुळशीचे रोप आपोआप उगवल्यामुळे वास्तूचे रक्षण होत असल्याचे जाणवणे : पूर्वी मला ‘घरात अनेक वाईट शक्ती वावरत आहेत’, असे दिसायचे. नंतर सर्वत्र साप दिसायचे. एकदा मला पू. संकेतदादांच्या अंगावरही साप दिसले होते; परंतु अलीकडे हे सर्व दिसणे बंद झाले आहे. त्याच कालावधीत सर्व उपाय करूनही आमच्याकडे तुळस जगत नव्हती. आता आपोआपच एक तुळशीचे रोप उगवले आहे. तुळशीमातेविषयी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होते; कारण ती वास्तूचे रक्षण करत आहे.
२. पू. संकेत कुलकर्णी यांनी पूर्वजांसाठी नामजपादी उपाय करणे
२ अ. महालय श्राद्धाच्या दिवशी सकाळी पूर्वजांच्या छायाचित्रांवर पुष्कळ त्रासदायक आवरण आल्याचे जाणवणे : ‘२६.९.२०२१ या दिवशी आम्ही घरी महालय श्राद्ध केले. तेव्हा सकाळी पूर्वजांची छायाचित्रे लावतांना मला पुष्कळ दाब जाणवत होता. माझ्या सासूबाईंचा तोंडवळा झोपल्यासारखा वाटत होता. माझ्या वडिलांच्या तोंडवळ्यावर त्रासदायक शक्तीचे पुष्कळ आवरण आल्यासारखे वाटत होते. त्या दिवशी पू. संकेतदादा उशिरा उठले. त्यांचे आवरून मी त्यांना बाहेरच्या खोलीत आणल्यावर त्यांनी पूर्वजांच्या छायाचित्रांना नमस्कार केला.
२ आ. पू. संकेतदादांनी पूर्वजांच्या छायाचित्रांकडे पाहून नामजप करणे : मी विश्रांतीसाठी खोलीत जातांना पू. संकेतदादांनाही खोलीत घेऊन जाणार होते; पण त्यांनी नकार दिला. थोड्या वेळाने माझे यजमान त्यांना खोलीत घेऊन येण्यासाठी बाहेर गेले. तेव्हा ‘पू. संकेतदादा एकटक छायाचित्रांकडे पाहून बोलत आहेत’, असे त्यांना वाटले. मीही पहायला गेल्यावर मलाही तसेच जाणवले.
२ इ. पू. संकेतदादांनी पूर्वजांच्या छायाचित्रांसमोर बसून नामजप केल्यावर छायाचित्रातील तोंडवळे प्रसन्न अन् हसरे दिसणे : पू. संकेतदादांनी छायाचित्रासमोर बसून ८ – ९ घंटे नामजप केला. त्यानंतर आम्हाला छायाचित्रांवरील दाब न्यून झाल्याचे जाणवले. नंतर सासूबाईंचे डोळे उघडे आणि तोंडवळा प्रसन्न वाटू लागला. ‘माझे सासरे पुष्कळ समाधानाने हसत पू. संकेतदादांकडे पहात आहेत’, असे मला जाणवले. माझ्या आईच्या छायाचित्राकडे पहातांना तिचा तोंडवळा पुष्कळ करुणामय जाणवला आणि ‘तिला मला काहीतरी सांगायचे आहे’, असे मला जाणवले. तिच्याकडे पाहून मला पुष्कळ रडू येत होते. त्या वेळी ‘ती जिवंत असून मला भेटायला आली आहे’, असे मला जाणवले.
३. महालय श्राद्ध झाल्यावर घरात दैवी सुगंध येणे
महालय श्राद्ध झाल्यापासून घरात एक दैवी सुगंध सलग ३ दिवस येत होता. ‘मी एका वेगळ्याच विश्वात वावरत आहे’, असे मला वाटले.
‘गुरुमाऊली, आपणच हा लेख माझ्याकडून लिहून घेतला’, यासाठी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सुजाता गुरुदास कुलकर्णी (पू. संकेत कुलकर्णी यांची आई), सांगली (२.१.२०२२)
|