नागपूर येथील रामधीरज रॉय यांची भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता !
तब्बल ३५ वर्षांनी मिळाला न्याय !
|
नागपूर – येथील वेस्टर्न कोल लिमिटेडचे तत्कालीन माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक रामधीरज रॉय यांची तब्बल ३५ वर्षांनंतर एका भ्रष्टाचार प्रकरणाच्या आरोपातून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने मुक्तता केली आहे. विशेष म्हणजे रामधीरज रॉय यांना वयाच्या ७६ व्या वर्षांपर्यंत अर्धे आयुष्य न्यायालयात लढा देण्यासाठी गेले आहे.
काय आहे प्रकरण ?
१. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोली) या आस्थापनाकडून वर्ष १९८७ मध्ये कामठी भागात २५ खाटांच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. हे कंत्राट एका खासगी आस्थापनाला देण्यात आले होते. त्यानंतर मात्र अचानक कंत्राटदार पालटण्यात आला.
२. यात हे कंत्राट इंडस इंजिनिअरींग आस्थापनाला देण्यात आले. यावरून भ्रष्टाचार झाल्याच्या कारणावरून वेकोलीचे माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक रामधीरज रॉय आणि कंत्राटदार आस्थापनाचे मालक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला होता.
३. तेव्हापासून चालू झालेला हा लढा वर्षानुवर्षे असाच चालू राहिला. या प्रकरणात रामधीरज रॉय यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात त्यांच्यावर असलेला गुन्हा रहित करण्यासाठी त्यांचे अधिवक्ता गुप्ता यांच्या वतीने याचिका प्रविष्ट केली. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून न्यायालयाने रामधीरज रॉय यांच्यावरील गुन्हा त्वरित रहित करत त्यांची निर्दोष सुटका केली.