पंजाबात भारत-पाक सीमेवर सापडले ५ किलो आर्.डी.एक्स. !

पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये स्फोट घडवण्यासाठी आय.एस्.आय आणि खलिस्तानी आतंकवादी प्रयत्नरत !

ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंतच्या सर्वच निवडणुका कधीच शांततेत पार पडत नाहीत. आतंकवादी, नक्षलवादी, गुन्हेगारी वृत्तीचे राजकीय पक्ष हे भारतीय लोकशाहीला अपयशी ठरवत आहेत, हे लक्षात घ्या ! – संपादक

अमृतसर (पंजाब) – विशेष कृती दलाला भारत-पाक सीमेलगत असलेल्या धनोए कला गावात ५ किलो आर्.डी.एक्स. स्फोटके सापडली आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात बाँबस्फोट घडवण्याचे षड्यंत्र असल्याचे सुरक्षायंत्रणांचे म्हणणे आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय आणि खलिस्तानी आतंकवादी यांचा यामागे हात असल्याचे म्हटले जात आहे. पोलीस आणि सुरक्षायंत्रणा ही स्फोटके सुरक्षित ठिकाणी हालवण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या स्थानिक लोकांचा शोध घेत आहेत.

धनोए कला गावातील एका शेतामध्ये ही स्फोटके सापडली. भारत-पाक सीमेवर असलेल्या विविध क्षेत्रांमध्ये गेल्या ५ मासांपासून सुरक्षायंत्रणांना ग्रेनेड, आर्.डी.एक्स., शस्त्रास्त्रे, तसेच मोठ्या प्रमाणात अमली पदार्थही सापडत आहेत.