लोहगडावर होऊ घातलेल्या उरूसाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून प्रशासनाला निवेदन

लोहगड

पुणे, १३ जानेवारी (वार्ता.) – लोहगडावर ‘हाजी हसरत उमरशहावली बाबा रहें’ ट्रस्टकडून उरूस साजरा करण्यात येणार असल्याविषयी एक पत्रक सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहे. लोहगड हे संरक्षित स्मारकामध्ये येत असून गडावर धार्मिक कार्यक्रमास बंदी आहे, तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र राज्यात संचारबंदी आणि जमावबंदीचे नियम लागू आहेत. रायगड, कुलाबा येथे झालेल्या अतिक्रमणाच्या घटनांमुळे आता लोहगडावरही असे संशयास्पद अतिक्रमण होत असल्याविषयी शिवप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ तीव्र संताप व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुरातत्व विभाग, जिल्हाधिकारी, तसेच स्थानिक पोलीस प्रशासन यांना निवेदन दिले आहे.

पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे (डावीकडून पहिले) यांना निवेदन देतांना बजरंग दलाचे कार्यकर्ते

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी हिम्मत खराडे यांना निवेदन देण्यात आले. यांसह पुणे येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, पुणे उपमंडळ आणि मुंबई येथे अधीक्षण पुरातत्व शास्त्रज्ञ, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई मंडल-महाराष्ट्र येथेही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

‘लोहगड’ या संरक्षित स्मारकावर अवैधरित्या होणारे धार्मिक कार्यक्रम कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, तरी विनाअनुमती कार्यक्रम झाल्यास आयोजक, ट्रस्ट आणि संबंधित सर्वांवर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. पुणे येथील जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते. बजरंग दलाच्या मावळ तालुक्यातील पदाधिकार्‍यांनीही लोणावळा पोलीस ग्रामीण येथे निवेदन दिले आहे.

‘पुरातत्व खात्याची अनुमती न घेता, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसतांना अशा प्रकारचा उरूस या कोरोना काळामध्ये होऊ नये’, अशा आशयाचे निवेदन मा. तहसीलदार, पुणे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांना देण्यात आले आहे.


हे पण वाचा –

लोहगडावरील उरुसाचे पत्रक

जमावबंदी आदेश धाब्यावर बसवून पुण्यातील लोहगडावर चालू आहे दर्ग्याच्या ऊरुसाची सिद्धता !
https://sanatanprabhat.org/marathi/542829.html


विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून ‘अशा प्रकारच्या विशिष्ट धर्माचे लांगूलचालन करणार्‍यांवर कडक कारवाई व्हावी, तसेच अशा प्रकारचा उरूस झाल्यास विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मोठ्या प्रमाणावर आंदोलन करेल’, अशी चेतावणी या निवेदनातून देण्यात आली आहे. हे निवेदन देतांना बजरंग दलाचे विभाग संयोजक संदेश भेगडे, जिल्हा मंत्री महेंद्र असवले, जिल्हा संयोजक बाळासाहेब खांडभोर, तालुका अध्यक्ष डॉ. गोपीचंद कचरे, तालुका संयोजक प्रशांत ठाकर आदी उपस्थित होते.