सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा चित्रपट बनवणार्‍या महेश मांजरेकर यांनी मराठीजनांची क्षमा मागावी !

महिला आणि बाल लैंगिक दृश्ये असणार्‍या ‘नाय वरनभात लोन्चा…’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

समाजमनावर विपरीत परिणाम करणार्‍या अश्लाघ्य चित्रपटांना अनुमती मिळणे निषेधार्ह ! – संपादक 

मुंबई – महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरनभात लोन्चा…’ या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ (चित्रपटाच्या प्रसारार्थ बनवलेला व्हिडिओ) पाहिल्यावर मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात इतक्या खालच्या दर्जाची कलाकृती कदाचित् झाली नसेल, असे लक्षात येते. चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मधून गिरणी कामगारांच्या स्त्रिया आणि त्यांची मुले यांच्याविषयी अत्यंत चुकीची दृश्ये अन् संवाद दाखवण्यात आले आहेत. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे आणि मराठीचा स्वाभिमान जागवणारे हेच ते महेश मांजरेकर आहेत का ? असा प्रश्न या निमित्ताने आम्हाला पडला आहे.

अत्यंत घाणेरड्या शिव्या, बालगुन्हेगारी, लहान मुलांसह अश्लील दृश्ये अशा अनेक गोष्टी या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मधून दिसून येतात. सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा चित्रपट बनवणार्‍या महेश मांजरेकर यांनी समस्त मराठीजनांची क्षमा मागावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

महेश मांजरेकर

याविषयी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे की,

या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ पाहून महाराष्ट्रासह देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनीही या चित्रपटावर आक्षेप नोंदवत केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळ अन् पोलीस प्रशासन यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित करण्याची सेन्सॉर बोर्डाने अनुमती कशी काय दिली ? असा प्रश्न असून याची चौकशी झाली पाहिजे. तसेच या चित्रपटाला चित्रपट परीनिरीक्षण मंडळाने मुळीच प्रमाणपत्र देऊ नये.