‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याच्या वेळी सांगली जिल्ह्यातील जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती
सांगली जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने १९.१२.२०२० या दिवशी एका ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी झालेल्या काही जिज्ञासूंच्या अनुभूती १३.१.२०२२ या दिवशीच्या अंकात पाहिल्या. आज उर्वरित जिज्ञासूंच्या अनुभूती पाहूया.
श्रीमती शोभा जाधव, पलूस, सांगली.
बहिणीच्या मुलाला कोरोनाची लागण होऊनही देवी आणि सद्गुरु यांच्या कृपेमुळे घरातील कुणालाही काहीही न होणे : ‘आम्ही ऑगस्ट २०२० पासून देवीचा सामूहिक नामजप करतो. आमच्या घरी माझा भाचा (माझ्या बहिणीचा मुलगा) रहातो. त्याला कोरोनाची लागण झाली होती; मात्र आम्हाला कुणाला ते कळले नाही. तो पूर्ण बरा झाल्यावर त्याची चाचणी केली असता त्याला कोरोना होऊन गेल्याचे लक्षात आले. त्याला कोरोना झालेला असतांना घरातील कुणालाही काहीही झाले नाही. घरातील सगळे सुखरूप होते. ही देवी आणि सद्गुरु यांची कृपा आहे.’
सौ. संजीवनी आवटी, सांगली
१. सत्संग आणि सेवा चालू झाल्यापासून शारीरिक त्रास नाहीसे होणे : ‘माझा नामजप भावपूर्ण आणि श्वासासह होत आहे. माझ्याकडे भ्रमणभाषद्वारे संपर्क करण्याची सेवा आहे. सत्संग आणि सेवा चालू झाल्यापासून माझे शारीरिक त्रास नाहीसे झाले आहेत. माझे मन शांत असते. एखादी अडचण आपोआप सुटते.
२. नवरात्रीत देवीवर कुंकूमार्चन केल्यावर ‘देवी सहस्रो हातांनी आशीर्वाद देत आहे’, असे जाणवणे : नवरात्रीच्या काळात कुंकूमार्चन विधी झाल्यावर देवीच्या प्रतिमेवर अनेक हात उमटल्याप्रमाणे कुंकू राहिले होते. तेव्हा ‘देवी सहस्रो हातांनी आशीर्वाद देत आहे आणि कृपा करत आहे’, असे मला जाणवले. दीपावलीतही मानसपूजा करतांना मी लक्ष्मी-नारायण घरी आल्याचे अनुभवले.’
कु. प्रणाली देसाई, रेठरेहरणाक्ष, ईश्वरपूर, सांगली.
लक्ष्मीपूजनाच्या वेळी कमळावर बसलेली साक्षात् श्री लक्ष्मीदेवी दिसणे आणि तिने आवश्यकतेनुसार धन मिळणार असल्याचे सांगणे : ‘मी लक्ष्मीपूजन करतांना आम्ही ज्या मूर्तीची पूजा केली, तिच्यामध्ये मला कमळावर बसलेली साक्षात् श्री लक्ष्मीदेवी दिसत होती. मी देवीला प्रार्थना करत होते, ‘माझ्या देहातील स्वभावदोष आणि अनिष्ट शक्ती निघून जाऊ दे.’ तेव्हा मला माझे स्वभावदोष आणि अनिष्ट शक्ती सूक्ष्मातून निघून जातांना दिसली. मी ‘आम्हाला धनसंपत्ती लाभू दे’, अशी प्रार्थना केली. तेव्हा देवीने दोन्ही हातांनी आमचे कपाट भरून ठेवल्याचे दिसले. देवी म्हणाली, ‘तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला पैसे दिसणार नाहीत; पण जेव्हा तुम्हाला आवश्यकता असेल, तेव्हा तुम्ही त्या कपाटात हात घातल्यावर पैसे मिळतील. तुम्हाला समजणारही नाही की, ‘हे पैसे कुठून आले.’
सौ. सुनिता शहाजी देसाई, रेठरेहरणाक्ष, ईश्वरपूर, सांगली.
‘गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना आणि नामजपादी उपाय केल्यामुळे कोरोनाचे संकट टळणे : ‘माझे पती श्री. शहाजी देसाई मागील मासात रुग्णाईत होते. आधुनिक वैद्यांनी त्यांना कोरोना चाचणी करायला सांगितली. आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुम्हाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.’’ आधुनिक वैद्यांनी यजमानांना घरीच थांबायला सांगितले. त्या वेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक औषधाच्या गोळ्या घेण्यास चालू केल्या. ‘आम्ही सातत्याने गुरुदेवांना प्रार्थना आणि नामजपादी उपाय करत होतो. ‘आमच्यावरील संकट कसे दूर झाले’, ते आम्हाला कळलेच नाही.’ (२०.१२.२०२०)
(क्रमश:)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |