‘भगवंताच्या भक्ताची जो काळजी घेतो, त्याची भगवंत काळजी घेतो !’, या वचनाची मंगळुरू, कर्नाटक येथील श्री. भरत प्रभु यांना आलेली प्रचीती !
१. ‘पू. भार्गवराम यांच्या आईची प्रकृती ठीक नसतांना वडिलांनी त्यांना सांभाळणे आणि पू. भार्गवराम यांना झोपवण्यापूर्वी ‘ते पलंगावरून खाली पडू नयेत’, यासाठी सर्व काळजी घेणे
‘एकदा सौ. भवानीला (माझ्या पत्नीला) बरे वाटत नव्हते. त्या वेळी घरी तिची काळजी घेणारे कुणीच नव्हते. मी घरी आल्यावर माझी अन्य सर्व कामे बाजूला ठेवली आणि ‘सौ. भवानीला विश्रांती मिळावी’, यासाठी पू. भार्गवराम (सनातनचे पहिले बालसंत) यांना सांभाळू लागलो. पू. भार्गवराम यांना झोपवण्यापूर्वी ‘ते माझ्या पलंगावरून खाली पडू नयेत’, यासाठी मी सर्व काळजी घेतली. मी झोपण्यापूर्वी ‘पू. भार्गवराम यांनी जरा जरी आवाज केला, तरी मला त्वरित उठायचे आहे’, अशी स्वतःला स्वयंसूचना दिली; कारण मी एकदा झोपल्यावर आवाज झाला, तरी मला जाग येत नाही.
२. स्वप्नात दिसलेले दृश्य -‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या पलंगावर झोपायला सांगणे आणि त्यांनी ‘तू पू. भार्गवराम यांना तुझ्या पलंगावर झोपवलेस आणि त्यांची चांगली काळजी घेतलीस, त्यामुळे तुझी काळजी घेणे माझे कर्तव्य आहे’, असे सांगणे
नंतर मला स्वप्नात दिसले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला आदराने त्यांच्या पलंगावर झोपायला सांगितले. तेव्हा मला आश्चर्य वाटले. मी त्यांना ‘तुम्ही मला तुमच्या पलंगावर झोपायला का सांगत आहात ?’, असे विचारले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘तू पू. भार्गवराम यांना तुझ्या पलंगावर झोपवलेस आणि त्यांची चांगली काळजी घेतलीस. त्यामुळे तुझी काळजी घेणे माझे कर्तव्य आहे.’ परात्पर गुरुदेवांचे हे वाक्य ऐकून माझी भावजागृती झाली आणि मी स्वप्नातच रडू लागलो.
३. ‘भगवंत त्याच्या भक्ताची किती काळजी घेतो !’, याची जाणीव होणे
तेव्हा ‘भगवंत त्याच्या भक्ताची किती काळजी घेतो !’, याची मला जाणीव झाली. ‘भगवंताच्या भक्ताची जो काळजी घेतो, त्याची भगवंत काळजी घेतो. पू. भार्गवराम यांची काळजी घेणे आणि त्यांची सर्व कामे करणे, ही ईश्वरसेवाच आहे’, हेही मला यातून शिकायला मिळाले.
४. भगवंताचे सर्वव्यापकत्व !
‘पू. भार्गवराम माझे पुत्र असल्याने त्यांची काळजी घेणे’, हे खरेतर माझे कर्तव्यच आहे. असे असूनही भगवंताने (परात्पर गुरुदेवांनी) मला स्वप्नात दर्शन दिले. पू. भार्गवराम यांचे दायित्व माझे असूनही भगवंताने माझ्याप्रती काळजी व्यक्त करून माझ्यावर कृपा केली. या प्रसंगातून मला जाणवले, ‘भगवंत किती श्रेष्ठ आणि महान आहे ! तो सर्वव्यापी आहे. ‘प्रत्येक दायित्व हे त्याचे आहे’, असे त्याला वाटते.
५. कृतज्ञता
भगवंताने मला दिलेल्या या शिकवणीबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. या प्रसंगात ‘पू. भार्गवराम यांची सेवा किती महत्त्वपूर्ण आहे आणि मला ती किती गांभीर्याने करायला हवी !’, याची मला जाणीव झाली. परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञता !’
– श्री. भरत प्रभु (पू. भार्गवराम यांचे वडील), मंगळुरू, कर्नाटक. (१२.१२.२०२१)
‘आज सात्त्विक बुद्धीचा लोप होत आला आहे. धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या नावाखाली लोक केवळ ऐहिक विषयासक्त आणि जडवादी बनले आहेत.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : ग्रंथ ‘होऊच द्या दोन हात’, पान ९१) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |