द्रमुकच्या हिंदुविरोधी कारवाया !
संपादकीय
तमिळनाडूमधील मुडिचूरजवळील वरदराजपूरम् येथे जलमार्गाच्या परिसरात बांधण्यात आलेले श्री नरसिंह अंजनेय स्वामी मंदिर महसूल खात्याच्या अधिकार्यांनी ‘अवैध’ ठरवत पाडले. राज्यात सत्तेवर असलेल्या द्रमुक सरकारने जलमार्गाला अडसर येत असल्याचे सांगत आतापर्यंत १५० मंदिरे पाडली आहेत. वर्ष २०१५ मध्ये जिल्हाधिकारी पी. अमुदा यांनी अंजनेय मंदिराची सर्व कागदपत्रे पडताळली होती आणि हे मंदिर कोणत्याही अतिक्रमित जागेत बांधले नसल्याचे सांगितले होते. असे असतांनाही नगरपालिकेच्या अधिकार्यांनी हे मंदिर पाडले. तमिळनाडूत विविध ठिकाणी जलमार्गाच्या परिसरात अतिक्रमण करून इमारती उभारल्याच्या घटना पुढे येत आहेत. या इमारतींना वैध ठरवून त्यांच्यावरील कारवाई रोखण्यात येते. अवैध बांधकाम पाडण्यात चुकीचे असे काहीच नाही; मात्र अंजनेय मंदिर ज्या प्रकारे पाडण्यात आले, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. ‘जिल्हाधिकार्यांनी मंदिराची पहाणी करून ‘जे मंदिर अवैध नाही’, असे सांगितले, ते मंदिर कसे काय पाडण्यात आले ?’, या प्रश्नाचे उत्तर नगर परिषदेच्या अधिकार्यांनी द्यायला हवे. यावरून ‘मंदिर पाडायचेच’, असे नगरपालिकेच्या अधिकार्यांनी ठरवले होते, असे समजायचे का ?
चेन्नई येथील बसस्थानकाच्या समोर एकाने सरकारी भूमीवर अतिक्रमण करून त्यावर बाल येशूला घेतलेल्या मदर मेरी हिचा पुतळा उभारला होता. या पुतळ्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्यामुळे तो हटवण्यासाठी अधिकारी गेल्यावर त्याला विरोध झाला. त्या वेळी अधिकार्यांनी काळजीपूर्वक हा पुतळा काढून तहसीलदार कार्यालयात आणून ठेवला, तसेच हा पुतळा बसवण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासनही दिले. यावरून प्रशासनाचा दुटप्पीपणा दिसून येतो. तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार आहे. त्यामुळे तेथील हिंदूंची मंदिरे असुरक्षित असणारच ! द्रमुकचा हिंदुद्वेष लपून राहिलेला नाही. या पक्षाकडून सातत्याने रावणाचे उदात्तीकरण आणि श्रीरामाचा दुःस्वास केला जातो. ‘तमिळी जनता ही भारतातील मूळ रहिवासी असून उत्तर भारतीय हे आर्य म्हणजे बाहेरून आलेले लोक आहेत’, असा दुष्प्रचार या पक्षाकडून वारंवार केला जातो. त्यामुळे भारतापासून विभक्त करून स्वतंत्र द्रविडीस्तान स्थापन करण्याचा मानस या पक्षाने वारंवार बोलून दाखवला आहे. सरकारीकरण केलेल्या मंदिरांचा पैसा विविध योजनांसाठी वापरणे, कोरोनाच्या काळात निधीचा अभाव असल्याचे सांगत सरकारीकरण झालेल्या मंदिरांमधील सोने वितळवून ते बँकेत तारण म्हणून ठेवून त्याद्वारे पैसे मिळवण्याचा घेतलेला निर्णय असे अनेक हिंदुद्रोही निर्णय सरकारने घेतले आहेत. सरकार हिंदुद्वेषी नीती राबवत आहे, हे निश्चित आहे. यामुळे केवळ तमिळनाडूतील नव्हे, तर भारतातील हिंदूंचे दायित्व वाढले आहे. तमिळनाडूतील हिंदुविरोधी प्रकार रोखायचे असतील, तर परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही. त्यासाठी तमिळनाडूत घडणार्या हिंदुविरोधी कारवायांच्या विरोधात भारतभरातील हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक !