रायगड जिल्ह्यातील सरसगड आणि मानगड येथे अनधिकृत थडगे, तर हिराकोट येथे अवैध दर्गा !
‘गड जिहाद’ !
|
मुंबई, १२ जानेवारी (वार्ता.) – कुलाबा दुर्ग आणि रायगड यांवर अनधिकृत थडगी बांधण्यात आल्याचा प्रकार समोर आला असतांना रायगड जिल्ह्यातील पाली येथील सरसगड, माणगाव येथील मानगड आणि रामनाथ (अलीबाग) येथील हिराकोट या गडांवरही अनधिकृत थडगी बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातील हा प्रकार पहाता राज्यभरातील अन्य गड आणि दुर्ग यांवरही अशी अनधिकृत थडगी बांधण्यात आली असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सरसगडावरील थडगे २०-२५ वर्षांपूर्वी बांधण्यात आले असून तेथे आता उरूस (मुसलमानांचा धार्मिक उत्सव) साजरा केला जातो. मानगडावर थडगे बांधून त्यावर चादर चढवण्यात आली आहे, तर हिराकोट येथे प्रथम थडगे बांधून आता त्याचा बाजूला भिंती उभारून त्याचे दर्ग्यामध्ये (मुसलमानांच्या सिद्धपुरुषांच्या समाधीस्थळामध्ये) रूपांतर करण्यात आले आहे.
हिराकोट गडाच्या समोर दर्शनी भागात अनधिकृत थडगे बांधूनही प्रशासनाकडून कारवाई नाही !
हिराकोट गडाचा सध्या कारागृह म्हणून उपयोग करण्यात येत आहे. या गडाच्या समोरच काही अंतरावर थडगे बांधण्यात आले आहे. या थडग्यावर चादर अंथरून त्याच्या तीनही बाजूला भिंती बांधण्यात आल्या आहेत. हे अनधिकृत बांधकाम काही वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. गडाच्या दर्शनी भागात आणि रस्त्याला अडथळा होईल, अशा पद्धतीने थडगे बांधूनही त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
यापूर्वी दर्ग्याच्या ठिकाणी एक धोंडाही नव्हता ! – रघुजी आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज
रामनाथ (अलीबाग) शहरातील हिराकोट गडाच्या समोरच रस्त्याच्या मध्यभागी एक अनधिकृत दर्गा उभा केला गेला आहे. हिराकोट गडाची जुनी छायाचित्रे माझ्याकडे आहेत. ज्यात त्या ठिकाणी साधा धोंडाही नाही, अशी माहिती सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री. रघुजी आंग्रे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.