लोकनेते ‘दि.बा. पाटील फेलोशिप’ची राज ठाकरेंकडून घोषणा
मुंबई – प्रकल्पग्रस्त आणि आगरी-कोळी समाजाचे दिवंगत ज्येष्ठ नेते दि.बा. पाटील यांच्या सन्मानार्थ ‘दि.बा. पाटील फेलोशिप’ अर्थात् पाठ्यवृत्ती चालू होत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. पाठ्यवृत्तीच्या पत्रकाचे अनावरण राज ठाकरे यांनी केले. या उपक्रमातून महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर अभ्यास व्हावा आणि हा सर्व अभ्यास महाराष्ट्रासमोर यावा, अशी सूचना या वेळी राज ठाकरे यांनी संयोजकांना केली आहे.
या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक आमदार राजू पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दि.बा. पाटील यांच्या कार्याला नमन करण्याच्या हेतूने ही पाठ्यवृत्ती (फेलोशिप) चालू केली आहे. नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कल्याण येथील शहरी ग्रामीण भागात आगरी-कोळी समाजापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण संशोधन व्हावे, ते प्रश्न सोडवल्यास समाजातील सर्वच घटकांना त्याचा लाभ होईल. या प्रश्नांच्या अभ्यासाचा दस्तऐवज सिद्ध व्हावा, हा यामागील उद्देश आहे.