लोकांनी सामाजिक माध्यमांचा वापर विवेकबुद्धीने करावा !
६ जानेवारी २०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आवृत्तीत ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’ …’ हा लेख वाचतांना त्यातील ‘वडिलांचे निधन झाल्याचे ठाऊक नसणे; मात्र भ्रमणभाषवरील नातेवाइकांच्या ‘श्रद्धांजली’ अशा आलेल्या लघुसंदेशामुळे निधन झाल्याचे कळून धक्का बसणे’, या उपमथळ्याकडे लक्ष गेले. हे वाचल्यावर ‘पूर्वीच्या काळी असे प्रसंग घरातील सदस्य किंवा नातेवाईक कशा प्रकारे हाताळत’, याविषयी विचारप्रक्रिया चालू झाली. पूर्वी घरातील कुणी मृत्यूशय्येवर असेल किंवा कुणाचा मृत्यू झाला असेल, तर मृताच्या बाहेरगावी असलेल्या नातेवाइकांना (मुलगा, मुलगी इत्यादी) ‘संबंधिताची प्रकृती गंभीर आहे, लवकर या’, असे घरातील अन्य सदस्य किंवा नातेवाईक यांच्याकडून सांगितले जायचे. घरी येऊन पोचेपर्यंत इतर कुणीही त्यांच्याशी काही बोलत नसे. ‘जवळची व्यक्ती मृत्यू पावली आहे’, हे समजल्यावर त्यांना धक्का बसू नये आणि ‘एकट्याने लांबचा प्रवास करता यावा’, हा यामागील उद्देश असे; पण आज प्रत्येकाच्या हातात भ्रमणभाष आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप, ट्विटर यांसारखी सामाजिक माध्यमे हाताळणे सर्वांना सहज उपलब्ध आहे; पण ‘यांचा वापर विवेकबुद्धीने कसा करावा ?’, हे अनेक लोकांना कळत नाही. कुणाचा मृत्यू झाला असेल, तर अशी बातमी व्हॉट्सॲपद्वारे लगेच सगळीकडे पसरते. आपल्या सद्भावना दर्शवण्यासाठी आणि श्रद्धांजली वहाण्यासाठी लोक लगेचच व्हॉट्सॲपवर ‘स्टेट्स’ (छायाचित्र किंवा संदेश ठेवण्याची सुिवधा) ठेवतात किंवा संदेश पाठवतात. ‘समोरची व्यक्ती कुठल्या मनस्थितीत आहे’, हेही त्यांना ठाऊक नसते. त्यामुळे शोक व्यक्त करतांना हे भान जपणे आवश्यक आहे, असे वाटते.
– श्री. अभिषेक अण्णप्पा पै, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०२२)