चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गामध्ये चीनची दादागिरी !
१. ‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गा’मुळे बलुचिस्तानमधील लोकांचा रोजगार हिरावून घेतला जाणे
‘चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गा’मुळे (चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे) स्थानिक बलुचिस्तानचे लोक अतिशय रागावलेले आहेत. या महामार्गाविरुद्ध अनेक हिंसात्मक कारवाया त्या भागात चालू झाल्या आहेत. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग हा पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातून निघतो आणि साडेचार सहस्र किलोमीटरचा प्रवास करून चीनच्या शिनझियांग प्रांतामध्ये प्रवेश करतो. या महामार्गाचा अर्ध्याहून अधिक भाग हा बलुचिस्तान प्रांतातून जातो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बलुचिस्तान हे पाकिस्तानचे सर्वांत मोठे राज्य आहे. तेथे नैसर्गिक साधनसंपत्ती पुष्कळ आहे. ही नैसर्गिक संपत्ती लुटण्यासाठीच तेथे चिनी येऊन पोचलेले आहेत. या महामार्गामुळे बलुचिस्तानच्या लोकांना कुठलाही लाभ होत नाही. तेथे स्थानिकांना कुठलाही रोजगार मिळत नाही. ग्वादर बंदर पूर्णपणे चीनच्या कह्यात गेले आहे. ग्वादर बंदराजवळ मच्छिमारनगर आहे. पूर्वी तेथील लोक समुद्रात जाऊन मासेमारी करायचे; परंतु आता चीन तेथे ‘डीप सी फिशिंग’ (खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणे) करणार्या ट्रॉलर्सच्या साहाय्याने मासेमारी करतो. त्यानंतर त्या माशांवर प्रक्रिया करून ते चीनला पाठवले जातात, म्हणजे ग्वादर बंदरामधील स्थानिक मासेमारांच्या उत्पन्नाचे साधनही चीनने बळकावले आहे. त्यामुळे बलुची लोकांच्या हातून हेही साधन हिरावून घेण्यात आले आहे.
२. ग्वादर बंदराच्या विकासाचा लाभ केवळ चीनला होणे आणि विकासकामांसाठी चिनी कामगारांना आणले जाणे
या बंदरावरील नोकर्या सर्व चिनी नागरिकांकडे गेल्या आहेत. तेथे ज्या थोड्या बलुची नागरिकांना आत येण्यास अनुमती असते, त्यांच्याशी चिनी नागरिकांची वर्तणूक अतिशय असभ्य आणि दादागिरी करणारी असते. याखेरीज तेथे बांधण्यात आलेली काही घरे आहेत आणि काही मोठे हॉटेल्स, तीही चीनकडे आहेत. ग्वादर बंदराचा जो विकास करण्यात आलेला आहे, त्याचा लाभ केवळ चिनी ‘ड्रॅॅगन’ला आहे, तेथील लोकांना नाही. हा महामार्ग ग्वादरमधून चालू होऊन पाकिस्तानच्या विविध प्रांतांमधून चीनमध्ये जातो. तेथे खनिजांचे उत्खनन करण्यासाठी चालू केलेल्या खाणी, ‘हायड्रो-इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट’ किंवा कोणतेही विकासाचे काम असेल, तर त्यासाठी चीनमधून कामगार आणले जातात. हे कामगार बहुतांश विविध कारणांनी कारागृहात असलेले बंदीवानच असतात. त्यामुळे या विकासकामांचा बलुची नागरिकांना कुठलाही लाभ होत नाही.
३. आर्थिक महामार्गाचा बलुची जनतेला कोणताच लाभ नसल्याने ‘लिबरेशन’ गटाकडून त्यावर आक्रमणे केली जाणे आणि पाकिस्तानने महामार्गाच्या रक्षणासाठी सैन्याच्या तुकड्या तैनात करणे
बलुचिस्तानमध्ये चीनने अनेक ‘हायड्रो-इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट’ उभारले आहेत. त्याची वीजही बलुची नागरिकांना मिळत नाही. तेथे जे रस्ते बांधण्यात आले आहेत, त्या रस्त्यांवरूनही वाहतूक करण्याची बलुची नागरिकांना अनुमती नाही. त्यामुळे बलुचिस्तानचा ‘लिबरेशन’ गट (पाकिस्तानपासून बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी कार्यरत गट) पाकिस्तान-चीन आर्थिक महामार्गावर आक्रमणे करत असतो. चिनी वाहने आणि माणसे यांवरही अनेक आत्मघातकी आक्रमणे झाली आहेत. बलुची लोक आक्रमण करतील, अशी चीनला भीती आहे. एवढा प्रचंड रस्ता बलुचिस्तानमधून जात असतांना त्याचा तेथील लोकांना काहीच लाभ नाही. एवढेच नव्हे, तर या रस्त्याच्या रक्षणासाठी चीनने पाकिस्तानला सांगून सैन्याच्या २ विशेष तुकड्या (२० ते ५० सहस्र सैनिक) तैनात केल्या आहेत.
४. बलुचिस्तानच्या लोकांनी चिनी दादागिरीच्या विरोधात स्वातंत्र्य चळवळ चालू करणे
जेव्हा चिनी लोक बाजारात किंवा अन्य ठिकाणी जातात, तेव्हा ते बलुची लोकांशी अतिशय क्रूरपणे वागतात. त्यांच्याशी अनावश्यक भांडणे करतात आणि त्यांना मारहाण करतात. त्यांना वाटते की, त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. अशा प्रकारच्या अनेक चित्रफिती समोर आल्या आहेत. एका चित्रफितीमध्ये असे दिसते की, चिनी लोक बलुची व्यक्तीला मारहाण करत आहेत आणि पाकिस्तानी सैनिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. चीनने पर्यावरणाला धोकादायक असलेले सर्व वाईट कारखाने बलुचिस्तानमध्ये आणले आहेत. उदा. कोळशाच्या साहाय्याने वीजनिर्मिती करणारे उद्योग तेथे आणल्याने त्याचे प्रदूषण बलुचिस्तानमध्ये होते. अशा कारणांमुळे बलुचिस्तानच्या लोकांना वेगळे व्हायचे आहे. त्यांना तेथे चीन अजिबात नको आहे.
थोडक्यात बलुचिस्तानची नैसर्गिक संपत्ती लुटली जाते, बलुचिस्तानच्या लोकांना महामार्गावर येऊ दिले जात नाही, ‘डीप सी फिशिंग’ करायला अनुमती नाही, मासेमारांना समुद्रात जाण्यास अनुमती नाही, अशा अनेक गोष्टींमुळे तेथील बलुचिस्तानची २ कोटींहून अधिक लोकसंख्या चीनवर अप्रसन्न आहे. त्यामुळे बलुचिस्तानमध्ये अनेक गट एकत्र आले आहेत. त्यांनी चिनी दादागिरीच्या विरुद्ध स्वातंत्र्य चळवळ चालू केली आहे. त्यासाठी त्यांना अनेक ठिकाणांहून साहाय्य मिळत आहे.
५. पाकिस्तान कर्जाच्या डोंगराखाली दबल्याने अधिक कर्ज मिळवण्याच्या मागे लागणे
पाकिस्तानही अतिशय चिंतेत आहे की, एवढा मोठा पाकिस्तान-चीन आर्थिक महामार्ग चालू झाला आहे. हा महामार्ग त्यांच्यासाठी एक पांढरा हत्ती बनला आहे. त्याचा लाभ जसा बलुचिस्तानी जनतेला झालेला नाही, तसा तो पाकिस्तानलाही फारसा झालेला नाही. पाकिस्तान एवढ्या मोठ्या कर्जाच्या डोंगराखाली दबला आहे की, त्यांना ते कर्ज फेडणे अशक्य आहे. त्यामुळे आता पाकिस्तान नवीन कर्ज मिळवण्याच्या मागे लागला आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) असो, वर्ल्ड बँक (जागतिक बँक) असो, चीन असो किंवा सौदी अरेबिया असो यांच्याकडून पाकिस्तानला कर्ज हवे आहे. एकंदरितच आर्थिक महामार्गामुळे पाकिस्तानच्या गळ्यात एक धोकादायक अशी माळच पडली आहे.
या महामार्गाचा चीनलाही काही लाभ नाही; कारण त्याला या महामार्गाचा जो वापर करायचा होता, तो पूर्णपणे करता आलेला नाही. थोडक्यात पाकिस्तान-चीन आर्थिक कॉरिडॉरमुळे बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांना प्रचंड हानी होत आहे अन् त्यांच्या समवेत चीनलाही हानी होत आहे. आता एवढी मोठी गुंतवणूक केल्याने चीनला याचा वापर करावाच लागेल. त्यामुळे येणार्या दिवसांमध्ये चीनच्या विरोधातील रोष वाढतच राहील, यात काहीही शंका नाही.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.