वस्तू आणि सेवा कर विभागाची फसवणूक करणार्या दोन व्यावसायिकांना अटक !
नवी मुंबई – मुंबई विभागाच्या नवी मुंबई वस्तू आणि सेवा कर (सी.जी.एस्.टी.) विभागाला बनावट देयके सादर करून करचुकवेगिरी करणार्या २ व्यावसायिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी ७० कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा कर यांचा समावेश असलेल्या बनावट इनपूट टॅक्स क्रेडीट दाखवून (शासनाचा कर चुकवण्यासाठी बनावट देयके सादर करणे) शासनाची फसवणूक केली आहे.
फसवणूक करणार्यांविरुद्ध, तसेच करचुकवेगिरी यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे मुंबई विभागाच्या सी.जी.एस्.टी. आणि सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजीव गर्ग यांनी सांगितले आहे.
विशेष कर चुकवेगिरी विरोधातील मोहिमेमध्ये ४ मासांत ५०० हून अधिक करचुकवेगिरीचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये ४० जणांना अटक करण्यात आली आहे. ४ सहस्र ५५० कोटी रुपयांचा कर भरला नसल्याचे आढळून आले आहे. या मोहिमेत ६०० कोटी रुपये कर वसूल करण्यात आला आहे.