कुणकेरी-आंबेगाव रस्त्याचे काम १५ जानेवारीपर्यंत चालू करण्याच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन मागे
दिलेल्या कालावधीत काम न झाल्यास कार्यालयावर धडक देण्याची ग्रामस्थांची चेतावणी
|
सावंतवाडी – वर्ष २०१९ मध्ये संमत झालेले तालुक्यातील कुणकेरी-आंबेगाव रस्त्याचे काम पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यालयासमोर चालू केलेले बेमुदत उपोषण अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल आवटी यांनी ‘१५ जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम चालू करू’, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मागे घेतले; मात्र ‘दिलेल्या कालावधीत काम चालू न झाल्यास उपोषण नाही, तर थेट कार्यालयावर धडक देऊ’, अशी चेतावणी ग्रामस्थांनी दिली.
गावातील या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे पादचारी आणि वाहनधारक यांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करून काम पूर्ण करावे, यासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली; मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे या कामासाठी १० जानेवारीला तिसर्यांदा आंदोलन केले. ‘जोपर्यंत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही’, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यानंतर १० जानेवारीला सायंकाळी विलंबाने उपअभियंता अनिल आवटी यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली अन् काम चालू करण्याचे आश्वासन दिले.