गोवा विधानसभा निवडणूक २०२२ : गोविंद गावडे भाजपमध्ये, तर लवू मामलेदार काँग्रेसमध्ये
पणजी, ११ जानेवारी (वार्ता.) – कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी ११ जानेवारी या दिवशी मंत्रीपदासह आमदारकीचेही त्यागपत्र देऊन सायंकाळी झालेल्या एका कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला, तर लवू मामलेदार यांनी ११ जानेवारी या दिवशी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गोविंद गावडे भाजपच्या तिकिटावर प्रियोळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मायकल लोबो यांच्यानंतर मंत्रीपदाचे त्यागपत्र देणारे ते दुसरे मंत्री ठरले आहेत.
Govind Gaude quits as min, MLA and joins BJP https://t.co/RuA5hjHXx0
— TOI Goa (@TOIGoaNews) January 11, 2022
प्रियोळ मतदारसंघातील स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोविंद गावडे यांना भाजपची उमेदवारी देण्यास यापूर्वीच विरोध केला आहे.
४ मासांत ११ आमदारांनी दिले त्यागपत्र : अजूनही काही आमदार त्यागपत्र देण्याच्या सिद्धतेतगोवा विधानसभेतील ४० पैकी एकूण ११ आमदारांनी आतापर्यंत पदाचे त्यागपत्र दिले आहे. आतापर्यंत भाजपचे ४, काँग्रेसचे ३, अपक्ष ३ आणि गोवा फॉरवर्डचा १ आमदार यांनी त्यागपत्र दिले आहे. गोव्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच हे घडत आहे. भाजपची उमेदवारीची सूची प्रसिद्ध झाल्यावर आणखीही काही आमदार पदाचे त्यागपत्र देऊ शकतात. २७ सप्टेंबर २०२१ या दिवशी काँग्रेसचे लुईझिन फालेरो यांनी प्रथम आमदारकीचे त्यागपत्र देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर जयेश साळगावकर, रवि नाईक, चर्चिल आलेमाव, रोहन खंवटे, एलिना साल्ढाणा, आलेक्स रेजिनाल्ड, कार्लुस आल्मेदा, प्रसाद गावकर, मायकल लोबो, प्रवीण झांट्ये आणि गोविंद गावडे यांनी त्यागपत्र दिले आहे. व्यक्तीगत स्वार्थापोटी त्यागपत्र देण्याची ही शृंखला चालू आहे आणि पक्षाची विचारधारा, तत्त्वे आदींना या ठिकाणी कोणतेच स्थान नाही. |
डिलायला लोबो यांची भाजपला सोडचिठ्ठी
मायकल लोबो यांची पत्नी डिलायला लोबो यांनी ११ जानेवारी या दिवशी भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले. डिलायला लोबो शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मायकल लोबो यांनी १० जानेवारी या दिवशी मंत्रीपद आणि आमदारकी यांचे त्यागपत्र दिले होते.
लवू मामलेदार यांचा राजकीय कारकिर्दीतील तिसरा पक्ष
लवू मामलेदार यांच्या राजकीय कारकीर्दीला मगो पक्षातून प्रारंभ झाला. यानंतर मगोप सोडून त्यांनी हल्लीच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूल आणि मगोप यांची युती झाल्यावर तृणमूल काँग्रेस सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना आगामी निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस आणि आप हे दोनच पर्याय राहिले होते.