सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर वैयक्तिक कामे पूर्ण करून पूर्णवेळ आश्रमात येण्यात वाईट शक्तींनी आणलेले अडथळे दूर होऊन कामे लवकर पूर्ण होणे
‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !
‘आम्हा कुटुंबियांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात यायचे होते. त्यामुळे आम्हाला आमची वैयक्तिक कामे लवकर पूर्ण करायची होती. ही सर्व कामे १ मासात पूर्ण होणे अपेक्षित होते; पण ती कामे ४ मास होऊनही पूर्ण होत नव्हती. याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही साधनेसाठी आश्रमात लवकर येऊ नये’, यासाठी वाईट शक्तींनी तुमची कार्यालयीन कामे पूर्ण होण्यात अडथळे आणले आहेत. वाहनाच्या संदर्भातील कामात मोठा अडथळा आहे आणि न्यायालयीन कामात मध्यम अडथळा आहे.’’ त्यानंतर त्यांनी आम्हाला ते अडथळे दूर करण्यासाठी नामजपादी उपाय करण्यास सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय केल्यावर कामांतील अडथळे दूर होऊन ती कामे पूर्ण झाली. यावरून ‘आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे महत्त्व किती आहे !’, हे गुरुकृपेने मला अनुभवता आले.
१. वैयक्तिक कामांतील अडथळे दूर करण्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय
१ अ. मोठा अडथळा असलेले वाहनाच्या संदर्भातील काम
१ अ १. नामजप : निर्गुण
१ अ २. न्यास : ओठांसमोर हाताचा तळवा आडवा धरणे
१ अ ३. कालावधी : प्रतिदिन ३ घंटे
हा जप १० दिवस केल्यावर या कामातील अडथळा दूर झाला.
१ आ. मध्यम अडथळा असलेले न्यायालयीन काम
१ आ १. नामजप : शून्य
१ आ २. न्यास : नाकासमोर हाताचा तळवा आडवा धरणे
१ आ ३. कालावधी : प्रतिदिन १ घंटा
हा जप ८ दिवस केल्यावर या कामातील अडथळा दूर झाला.
२. नामजप आणि न्यास केल्यावर वाहनाच्या संदर्भातील रखडलेले कार्यालयीन काम अल्प कालावधीत पूर्ण होणे
सर्वांत मोठा अडथळा वाहनाच्या कामाच्या संदर्भातील होता. हे काम साधारण १५ दिवसांचे होते; परंतु साडेतीन मास होऊनही ते काम पूर्ण होत नव्हते. कार्यालयीन अधिकारी आमची धारिका (फाईल) त्यांच्यापुढे आल्यावर फार चिडचिड करत होते आणि काम करणे टाळत होते. एक साधक कार्यालयीन अधिकार्यांना भेटायला गेल्यावर ते अधिकारी योग्य प्रतिसाद देत नव्हते.
त्यानंतर गुरुकृपेने देवाने मला नामजप आणि न्यास करण्याची बुद्धी दिली. नामजप आणि न्यास चालू केल्यावर संबंधित अधिकारी सकारात्मक झाले आणि त्यांनी ते काम काही घंट्यांमध्ये पूर्ण करून दिले. त्या दिवशी गुरुवार आणि वैकुंठचतुर्दशी होती. आम्ही भ्रमणभाषवर दुपारचा भक्तीसत्संग ऐकत असतांना आमचे ते काम पूर्ण झाले.
‘भक्तीसत्संगाच्या चैतन्यामुळे आणि संतांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे साडेतीन मास रखडलेले काम पूर्ण झाल्याची अनुभूती देवाने आम्हाला दिली’, त्याबद्दल भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अमित डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.११.२०२१)
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करतांना झालेले त्रास
१. ‘सद्गुरु गाडगीळकाकांनी एक कार्यालयीन काम पूर्ण होण्यासाठी ‘निर्गुण’ हा जप न्यास करत करायला सांगितला होता. तो करत असतांना मला ‘ताप येणे, दिवसभर झोपावे लागणे, न्यास करत असतांना हात दूर फेकला जाणे’ इत्यादी त्रास झाले.’
– श्री. अमित डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२. ‘निर्गुण’ हा जप करत असतांना मला ताप आला.’
– कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३. ‘मी ‘निर्गुण’ हा जप चालू केल्यावर माझा रक्तदाब पुष्कळ वाढला.’
– श्रीमती मंदाकिनी डगवार (३.१२.२०२१)
पू. अशोक पात्रीकरकाकांनी सांगितल्याप्रमाणे ‘संकटनिवारण मंत्र’ लावल्यावर भ्रमणभाष संच नादुरुस्त होणे आणि दुसर्या भ्रमणभाष संचामध्ये तो मंत्र ‘डाऊनलोड’ न होणे
‘वैयक्तिक कामांमध्ये अडथळे आल्यावर पू. अशोक पात्रीकरकाकांनी ‘संकटनिवारण मंत्र’ घरामध्ये लावून ठेवायला सांगितला.
संकटनिवारण मंत्र
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ।।
अर्थ : शरण आलेल्या दीनजनांना तारण्यास सदैव तत्पर अशा सर्वांचे दुःख दूर करणार्या हे देवी नारायणी (दुर्गादेवी), तुला माझा नमस्कार असो.
हा मंत्र भ्रमणभाषवर ऐकल्यावर माझा भ्रमणभाष संच नादुरुस्त झाला. दुसर्या भ्रमणभाष संचामध्ये तो मंत्र ‘डाऊनलोड’ होत नव्हता.’ – श्रीमती मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(३.१२.२०२१)
|