महाराष्ट्र राज्य दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर ?
|
मुंबई, ११ जानेवारी (वार्ता.) – भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच महाराष्ट्र कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. अनेक रुग्ण हे उपचाराधीन आहेत. त्यामुळे वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात दिवसाला २७० ते ३०० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागत होती; मात्र सध्या दिवसाला ४२४ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी वाढली, तर दळणवळण बंदीविना पर्याय उरणार नाही, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या राज्याची वाढत असलेली ऑक्सिजनची मागणी पहाता राज्य दळणवळण बंदीच्या उंबरठ्यावर आहे, असे चित्र आहे.
ऑक्सिजनची ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्याकडे मुबलक साठा आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता वा टंचाई भासणार नाही, तसेच पहिल्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, असा दावा अन्न आणि औषध प्रशासनाने केला आहे. तरीही ऑक्सिजनची अशीच मागणी वाढत गेली, तर टंचाई भासणार आहे. पहिल्या लाटेत दिवसाला ८५० मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन लागत होता, नंतर त्याची मागणी वाढून दीड सहस्र मेट्रिक टनापर्यंत पोचली; पण या मागण्यांच्या तुलनेत ऑक्सिजनची निर्मिती अल्प होत असल्याने पहिल्या लाटेत ऑक्सिजनची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. एप्रिल २०२१ मध्ये दुसर्या लाटेच्या वेळी दिवसाला १ सहस्र ६०० ते १ सहस्र ८०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता. नंतर मात्र ऑक्सिजनची मागणी अल्प होत गेली. याआधी १० टक्के उपचाराधीन असणार्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती; पण आता मात्र केवळ २ टक्के लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे; मात्र असे असले, तरी गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उपचाराधीन असणार्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता वाढत आहे.