जातीय तेढ निर्माण करणार्या ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटावर शासनाने बंदी घालावी !- अजयसिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना
मुंबई – दलित, बहुजन आणि ब्राह्मण यांच्यात दंगल निर्माण व्हावी, यासाठी ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या विरुद्ध काल्पनिक कथांचा समावेश करण्यात आला आहे. हा चित्रपट धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणारा आहे. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी केली आहे.
याविषयी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात श्री. अजयसिंह सेंगर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. येथे इंग्रजांकडून लढलेल्यांचा उदो-उदो होऊ दिला जाणार नाही. या देशात इंग्रज आणि मोगल यांच्याकडून लढले ते गद्दार अन् देशद्रोही आहेत. त्यांचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशाकरिता प्राण अर्पण करणार्या क्रांतीकारकांचा अपमान होय. या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये खोटा जातिवाद दाखवून दलितांची माथी भडकवली जात आहेत. खोट्या इतिहासावर आधारित असलेल्या या चित्रपटाला महाराष्ट्रात विरोध केला जाईल.