प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाऐवजी खलिस्तानी ध्वज फडकावण्याची ‘सिख फॉर जस्टिस’ची चेतावणी !

खलिस्तानच्या माध्यमातून भारताच्या विभाजनाचे बीज पेरणार्‍यांना नष्ट न केल्याचाच हा परिणाम आहे. ही स्थिती आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक 

नवी देहली – २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाऐवजी खलिस्तानी ध्वज फडकावण्यात येईल, अशी चेतावणी ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने दिली आहे. या संघटनेचा प्रमुख आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू विदेशातून सामाजिक माध्यमांद्वारे भारतात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. याविषयीचा एक फलक (पोस्टर) प्रसारित करण्यात आला असून त्यावर ‘२६ जानेवारीला पंतप्रधान मोदी यांच्या तिरंग्याला विरोध करून खलिस्तानी ध्वज फडकवा’, असे लिहिले आहे.

खलिस्तानी आतंकवाद्यांच्या या चेतावणीमुळे देशातील सुरक्षायंत्रणा सक्रीय झाल्या आहेत. प्रजासत्ताकदिनी नवी देहलीतील सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. एकूणच या माध्यमातून पुढील मासात होणार्‍या पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात पुन्हा एकदा शांती भंग करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.