आरोग्य विभाग पेपरफुटीच्या प्रकरणातील बीड जिल्ह्यातील २ शिक्षक निलंबित !
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची कारवाई
बीड – आरोग्य विभागाच्या पेपरफुटीच्या प्रकरणात बीड जिल्ह्यात उद्धव प्रल्हाद नागरगोजे आणि विजय नागरगोजे या २ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अटक झाली आहे. या दोन्ही शिक्षकांवर १० जानेवारी या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी निलंबनाची कारवाई केली. उद्धव नागरगोजे हे बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत आहेत, तर विजय नागरगोजे हे बीड तालुक्यातीलच काकडहिरा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे. आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात या दोघांनीही प्रश्नपत्रिका मिळवून त्या वाटल्या होत्या. पुणे सायबर पोलिसांच्या अन्वेषणामध्ये दोघांची नावे समोर आल्यानंतर सायबर पोलिसांनी दोघांना अटक केली होती. अद्यापही ते पुणे पोलिसांच्या कह्यात आहेत. या प्रकारामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याकडे पाठवला होता.