गोवा येथील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी धर्मप्रेमींनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

६.२.२०२१ या दिवशी गोवा येथे ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली. या सभेच्या प्रसारासाठी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न, त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांचे अभिप्राय येथे दिले आहेत.

श्री. विनय मडगावकर, प्राध्यापक, शिवोली. 

‘मी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा विषय अधिकाधिक जणांकडे पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे; कारण ही काळाची आवश्यकता आहे. ‘सभेच्या ‘पोस्ट’ (माहिती) अशा असायला पाहिजेत की, त्या वाचून सभा ऐकण्याची इच्छा नसणार्‍या व्यक्तीच्या मनातही सभा ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली पाहिजे’, असे मला वाटते. तुम्ही फार चांगले कार्य करत आहात. आपण सर्व मिळून हे कार्य पुढे नेऊया.’

सौ. हेमलता कळंगुटकर, नेरूळ, पणजी.

१. ‘मी आणि माझी मुलगी कु. हर्षदा कळंगुटकर हिने हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या दिवशी आमचा दूरचित्रवाणी संच बाहेर ठेवला होता. त्यामुळे धर्मप्रेमी महिला आणि वाचक यांना हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा लाभ घेता आला.

२. मी दूरचित्रवाणी संचाच्या बाजूला भगवान श्रीकृष्णाचे चित्र ठेवले होते. ‘त्या श्रीकृष्णाच्या चित्रातून सुगंध येत आहे’, अशी अनुभूती तेथील २ महिलांना आली.

३. हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना आमच्या आजुबाजूच्या घरांतील वीजपुरवठा खंडित झाला होता; मात्र आमच्या घरातील वीजपुरवठा सुरळीत चालू होता.

४. मी लहान मुलांना बसण्यासाठी एक चटई अंथरली होती; परंतु लहान मुले न आल्याने चटई रिकामी होती. ‘चटईवर प.पू. गुरुदेव बसले आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले आणि माझी भावजागृती झाली.

५. मी ‘प्रत्यक्ष सभा बघत आहे’, असे मला वाटत होते.’

सौ. आर्या गावकर, मडगाव

१. ‘मी एका मंदिरात हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा फलकाद्वारे प्रसार करण्यासाठी गेले होते. त्या वेळी मंदिरातील ‘श्री महालक्ष्मीदेवी विष्णुस्वरूप प.पू. गुरुमाऊलीच्या कार्याची आतुरतेने वाट पहात आहे’, असे मला जाणवले.

२. मी फलक ठेवत असतांना मंदिरात आरती चालू झाली. तेव्हा ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी श्री महालक्ष्मीदेवीचा कृपाशीर्वाद मिळत आहे’, असे मला जाणवले. मंदिरात फलक लावल्यावर मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

३. ‘प.पू. गुरुमाऊली, वास्तुदेवता आणि ग्रामदेवता यांनी फलकाच्या माध्यमातून परिसराची शुद्धी करून घेतली’, असे मला जाणवले. त्यामुळे परिसरात सात्त्विक स्पंदने जाणवत होती.

४. प.पू. गुरुदेवांनी सेवा निर्विघ्नपणे करून घेतली. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

श्रीमती संध्या मयेकर, मडगाव

१. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा ‘ऑनलाईन’ प्रचार करतांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत होता.

२. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या दिवशी गुरुमाऊलीने माझ्याकडून पूर्ण दिवस सकारात्मक राहून सेवा करून घेतली. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

सौ. सोनाली सावंत, माशेल

१. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार कसा करायचा ?’, हा विषय समजल्यावर माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. ‘अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करायचा’, असा मी निश्चय केला.

२. माझ्या मुलीचा तिथीनुसार वाढदिवस असतांना देवाच्या कृपेने हिंदु जनजागृती समितीच्या एक कार्यकर्त्या घरी आल्या होत्या. त्यानिमित्त मी आजुबाजूच्या घरांतील महिलांना एकत्र केले. ताईने त्यांना हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा विषय सांगितला.

३. त्या महिलांचा सकारात्मक प्रतिसाद पाहून मला पुष्कळ उत्साह वाटला. मी माझ्या संपर्कातील पालक आणि नातेवाईक यांच्याही २ बैठका ठरवल्या. त्या वेळी माझा त्यांच्यातील जिज्ञासूंशी संपर्क झाला आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

४. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांना पाहून आणि तेथील वातावरण पाहून माझी भावजागृती झाली. मला ‘याच स्थितीत रहावे’, असे वाटत होते.’

सौ. सुमित्रा अराबेकर, पिळर्ण, सालिगाव.

‘मला तेथील एका देवळात कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी मी मंदिरातील उपस्थित भक्तांना हिंदु राष्ट्र-जागृती सभेला येण्याची विनंती केली. त्यांतील काही जण हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित होते.

सौ. सुमित्रा अराबेकर यांच्याविषयी अन्य धर्मप्रेमींना जाणवलेली वैशिष्ट्ये

‘सुमित्राताईंना भ्रमणभाष केल्यावर ‘त्यांचा प.पू. गुरुमाऊलीप्रतीचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा) भाव वृद्धींगत झाला आहे’, असे जाणवत होते. त्या सतत ‘हे सर्व प.पू. गुरुमाऊली करवून घेत आहेत’, असे म्हणत होत्या. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या २ दिवस आधी ‘त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येत आहेत’, असे त्यांच्याशी बोलतांना इतरांना जाणवत होते. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाल्यावर त्या पुष्कळ आनंदी आहेत’, असे जाणवत होते आणि त्या सतत कृतज्ञता व्यक्त करत होत्या.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक