श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !
१. एक अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान असलेला ‘बसरा’ मोती काढण्यासाठी मानवाने तो ज्या शिंपल्यांत तयार होतो, त्या प्रजातीच्या शिंपल्यांना नष्ट केल्यामुळे आता तो दुर्लभ असणे
‘सेवेनिमित्त आम्ही एका राज्यातील एका मोत्यांच्या व्यापार्यांकडे गेलो होतो. तेव्हा आम्हाला त्यांच्याकडून एक धक्कादायक माहिती कळली. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘मोत्यांचे जे विविध प्रकार आहेत, त्यांपैकी ‘बसरा’ मोती हा एक दुर्मिळ आणि अतिशय मौल्यवान मोती आहे. या मोत्याचे मूल्यही (किंमतही) पुष्कळ असते. आज हा मोती मिळणे फार कठीण झाले आहे; कारण हा मोती ज्या शिंपल्यांमध्ये तयार होतो, त्या प्रजातीच्या शिंपल्यांना पन्नास वर्षांपूर्वीच लोकांनी शोधून काढून त्यांना मारून (नष्ट करून) त्यांतील मोती काढून घेतले आहेत. आता ही प्रजाती पृथ्वीवरून जवळजवळ नाहीशी झाल्यासारखीच आहे.’’ हे ऐकून माझ्या मनाला फार दुःख झाले आणि मनुष्याच्या या विकृत वागण्याचे वाईटही वाटले.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मोती धारण करण्याविषयी सांगितलेली दुर्मिळ माहिती आणि आध्यात्मिक दृष्टीकोन
‘मोती’ हा नवरत्नांपैकी एक आहे. नवग्रहांची जी नवरत्ने आहेत, त्यांमध्ये मनाचा ग्रह असलेल्या चंद्राचे रत्न ‘मोती’ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनोबळ, मानसिक स्वास्थ्य आणि शांतीचा कारक असलेला ग्रह आहे. या गुणांचा लाभ होण्यासाठी चंद्राचे रत्न म्हणून मोती धारण केला जातो. आज हा खरा मोतीच पृथ्वीवरून नष्ट होत चालला आहे.
३. मनाच्या आंदोलनांना नियंत्रित करणार्या या मोत्यांना माणसाच्या माध्यमातून नष्ट करण्याचे वाईट शक्तींचे हे एक प्रकारचे नियोजन असणे
वाईट शक्ती माणसांच्या माध्यमातून अशी दुर्मिळ दैवी रत्नेच या पृथ्वीवरून नाहीशी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मोत्याच्या स्पर्शाने मनावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते, तसेच त्याने मनुष्याचे चंद्रबळही वाढते. हे रत्न पृथ्वीवरून नाहीसे केले की, मानवजात आपोआपच मोत्यांच्या दैवी स्पर्शापासून वंचित रहाणार आहे. ‘मनाच्या आंदोलनांना नियंत्रित करणार्या या मोत्यांना नष्ट करण्याचे वाईट शक्तींचेच हे एक प्रकारचे नियोजन आहे’, असे वाटले.
४. सध्या मनुष्याचे मनोविकार वाढलेले असतांना मनुष्याला चैतन्याचा लाभ करून देणार्या सर्व गोष्टींवर आक्रमणे करून त्या हुशारीने संपवण्याचे वाईट शक्तींचे नियोजन असणे
सध्याच्या स्थितीला मनुष्याच्या मनाचे विकार वाढले आहेत. सर्वत्र लोक मानसिक व्याधींनी त्रस्त झाले आहेत. आजकाल समाजात क्षुल्लक कारणांवरून मानसिक त्रास सहन न झाल्याने थेट आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढलेले आढळते. माणसाची ही विकृती माणसालाच गिळंकृत करत चालली आहे. ज्यांद्वारे मनुष्याला चैतन्याचा लाभ होतो, अशा सर्व गोष्टींवर आक्रमणे करून त्या हुशारीने संपवण्याचेच नियोजन वाईट शक्तींनी केले आहे. माणूसही पैशांच्या हव्यासापोटी स्वतःच स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेत आहे.
५. निसर्गदत्त सुंदर देणगी असलेल्या मोत्यांना जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे, हे माणसाचे दायित्व असणे, अन्यथा त्याला निसर्गाच्या कोपाला सामोरे जावे लागणार !
मोती म्हणजे देवाने निसर्गाच्या माध्यमातून मानवाला दिलेली सुंदर देणगी आहे. त्यांना जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे, हे मनुष्याचे दायित्व आहे. मनुष्याने आजच जर स्वतःला सुधारले नाही, तर निसर्गाचा कोप होऊन काळच त्याला या पृथ्वीवरून नष्ट केल्याविना रहाणार नाही.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (१८.४.२०२०)