योग्य निर्णय आल्यास एस्.टी. महामंडळाचे विलीनीकरण करू ! – अनिल परब, परिवहनमंत्री

अनिल परब, परिवहनमंत्री

मुंबई – एस्.टी. महामंडळाच्या विलीनीकरणाविषयी योग्य निर्णय आला, तर ते करण्यात येईल, असे आश्वासन परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले आहे. एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपाविषयी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिवहनमंत्री अनिल परब आणि एस्.टी. कर्मचारी कृती समिती यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर कृती समितीच्या सदस्यांनी कर्मचार्‍यांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे.

अधिवक्ता गुणरत्न सदावर्तेंच्या आक्रस्ताळेपणामुळे एस्.टी. कर्मचार्‍यांची चूल बंद होण्याची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया एस्.टी. कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.

कृती समितीच्या संदीप शिंदे यांनी सांगितले की, या बैठकीमध्ये कर्मचार्‍यांना पदनिहाय वेतनश्रेणीसह ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याविषयी एस्.टी. चालू झाल्यानंतर चर्चा करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे. तसेच वेतनवृद्धीमधील त्रुटी दूर करण्याची हमी त्यांनी दिली आहे. एस्.टी. पूर्णपणे चालू झाल्यानंतर कारवाई झालेल्या कर्मचार्‍यांना कामावर घेण्याविषयी विचार करण्यात येईल, असेही परब यांनी सांगितले आहे.

कर्मचार्‍यांच्या डोक्यामध्ये सदावर्ते यांनी विलीनीकरणाच्या संदर्भात भ्रम निर्माण केला आहे, असा आरोप कृती समितीच्या सदस्यांनी केला आहे.