श्री चौरंगीनाथ डोंगराच्या पायथ्याशी चालू असलेले शेरे हद्दीतील खडीक्रशर आणि उत्खनन तात्काळ बंद करून संबंधितांवर कडक कारवाई करा !
शिवसेनेचे सचिन चव्हाण यांचे कराड तहसीलदारांना निवेदन
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून हे बंद का करत नाही ? – संपादक
कराड, १० जानेवारी (वार्ता.) – सहस्रो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चौरंगीनाथ डोंगरावर चौरंगीनाथ मंदिराच्या पश्चिमेच्या पायथ्याशी खडीक्रशरच्या माध्यमातून गौणखनिज उत्खनन चालू आहे. या उत्खननामुळे डोंगराची दुरवस्था होत असून डोंगर पोखरला गेल्याने डोंगराची अवस्था पहावत नाही, अशी झाली आहे. या उत्खननामुळे मंदिरातील खांबांना तडे गेले असून मंदिराच्या मंडपालाही धोका निर्माण झाला आहे, तरी श्री चौरंगीनाथ डोंगराच्या पायथ्याशी चालू असलेले शेरे हद्दीतील खडीक्रशर आणि उत्खनन तात्काळ बंद करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे सांगली जिल्हा कामगार सेना उपाध्यक्ष श्री. सचिन चव्हाण यांनी कराड तहसीलदारांना दिले आहे.
(सौजन्य : Prime News)
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या उत्खननामुळे ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथाच्या मंदिरालाही तडे गेले आहेत. सततच्या उत्खननामुळे लोकांच्या कूपनलिका आणि विहिरी यांची हानी होऊन त्यांना आता पाणी नाही, अशी स्थिती आहे.
केवळ पैशांच्या हव्यासापोटी नियमाविरुद्ध हे उत्खनन होत आहे, तरी अवैध उत्खनन करणारे आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनाने या विरोधात कृती न केल्यास प्रसंगी न्यायालयात जाण्याचीही आमची सिद्धता आहे.