आयुष्यातील अत्यंत प्रतिकूल काळात प्रारब्धाचे भोग भोगतांना भगवंताने पावलोपावली साहाय्य करून दिलेला आधार !
१. साधिकेने सासरी रहातांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांसाठी कृती करत आहे’, या भावाने घरातील व्यक्तींसाठी कृती करणे, त्यामुळे आनंद मिळणे आणि ते पाहून कुटुंबियांची चिडचिड होणे
‘मध्यंतरी काही काळासाठी मी सासरी रहात होते. मी सासरी प्रथमच अधिक काळासाठी राहिले होते. त्या वेळी घरातील व्यक्तींसाठी काही कृती करतांना मी ‘परात्पर गुरु डॉक्टरांसाठीच या कृती करत आहे’, असा विचार करून त्या करायचे. त्यातून मला पुष्कळ आनंद मिळायचा. त्यामुळे ‘मी आश्रमापासून दूर आहे’, असे मला कधी वाटले नाही. ‘मला कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य नाही’, असे घरातील व्यक्तींना वाटायचे. मला आनंदी असलेले पाहून त्यांची चिडचिड होत असे. देव समवेत असल्याने या गोष्टीकडे मला सहजतेने पहायला जमू लागले होते. त्यातूनही मन कधी भावनाप्रधान झाले, तर त्याच रात्री स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टर येऊन त्याविषयी समजावून सांगत. असे अनेकदा घडले आहे.
२. सासरी रहातांना अनेक बंधनांमुळे मनाची घुसमट होणे आणि देवाने सुचवल्यानुसार प्रयत्न केल्यावर ताण न्यून होऊन आनंद मिळू लागणे
२ अ. कुटुंबियांसमवेत घरी रहातांना अनेक बंधने असल्याने पिंजर्यात कोंडल्याप्रमाणे होऊन मानसिक त्रास होणे : घरातील सदस्यांच्या समवेत लहानशा घरात रहातांना मला एखाद्या पिंजर्यात कोंडल्याप्रमाणे होत असे. त्यात घरातील व्यक्तींकडून मला अनेक बंधनेही होती.
१. मी शेजार्यांकडे किंवा जवळ रहाणार्या साधकांकडे गेलेले त्यांना चालायचे नाही.
२. मी आठवड्यातून एकदाच बाजारात जायचे आणि ‘गेले, तरी मी एक घंट्याच्या आत घरी परत यायला हवे’, असे ते सांगायचे.
३. मी प्रसारसेवेसाठी बाहेर गेले, तरी त्यांची चिडचिड होत असे.
४. घरात सतत मोठ्या आवाजात दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम चालू असल्याने मी आतल्या खोलीत बसून सेवा करायचे; पण तेही त्यांना आवडायचे नाही.
ते अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणांवरून चिडचिड करत असल्यामुळे ‘आता नेमके कसे करायचे ?’, असा मला प्रश्न पडायचा.
२ आ. देवाने घरातल्यांच्या आवडीनिवडीनुसार वागण्यास सांगितल्यावर घरातल्यांचे मन जपून त्यांच्या आवडी सांभाळण्याचा प्रयत्न करू लागणे : एके दिवशी देवाने मला सुचवले, ‘आता मी जे तुला सांगत आहे, तेवढ्यावरच लक्ष दे. बाकी काही विचार करू नकोस.’ त्यानंतर देवाने ‘कुटुंबातील एक जवळची व्यक्ती माझ्या सासू-सासर्यांशी जशी बोलते’, तसे मला बोलण्यास सांगितले. देवाने मला एवढाच प्रयत्न १५ ते २० दिवस करण्यास सांगितला. त्यानंतर देवाने मला ‘परेच्छा’ म्हणून त्यांच्या आवडीनिवडीनुसार वागण्याला प्राधान्य देण्यास सांगितले. मी तसा प्रयत्न करू लागले. मला दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहायला आवडायचे नाहीत. त्यामुळे त्यांनी काही कार्यक्रम लावल्यावर मी माझ्या आवडीची कामे करायचे. याविषयी देवाने मला सांगितले, ‘तू इतरांच्या समवेत बाहेरच्या खोलीत बस आणि मनाने नामजप कर.’ त्यानंतर मी त्यांच्या आवडीचा कार्यक्रम त्यांच्या समवेत पाहू लागले. कार्यक्रम पहातांना मी मनातून नामजप किंवा भावप्रयोग करत असे आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करत असे.
२ इ. कुटुंबियांच्या आवडीनिवडीनुसार वागू लागल्यानंतर कृतीतून प्रेम व्यक्त होऊ लागल्याने त्यांच्या वागण्यात पालट होऊ लागणे आणि त्यामुळे मनावरील ताण न्यून होऊन आनंद मिळू लागणे : त्यानंतर कुटुंबियांच्या वागण्यात कमालीचा पालट झाला. याविषयी मी देवाला विचारले, ‘‘माझे काय चुकत होते; म्हणून असे घडत होते आणि आता तू सांगितल्यावर असा पालट कसा काय झाला ?’’ त्यावर देवाने सांगितले, ‘‘तुझ्या मनात असलेले प्रेम बोलण्यातून आणि कृतीतून व्यक्त होऊन त्यांच्यापर्यंत पोचणे महत्त्वाचे होते.’’ मला साधनेव्यतिरिक्त अन्य विषयांवर बोलायला जमत नव्हते; परंतु देवाने सांगितल्याप्रमाणे मी अन्य विषयांवर त्यांच्या आवडीनिवडीनुसार प्रयत्नपूर्वक बोलू लागले आणि त्यांना आवडेल तसे करू लागले.
देवाने माझ्याकडून अशा छोट्या छोट्या कृती करून घेतल्या. त्यामुळे माझ्या मनावरील ताण न्यून होऊन मला आनंद मिळू लागला. देवाने मला आश्रमजीवन आणि व्यावहारिक जीवन यांचा मेळ घालून दिला अन् माझ्यासाठी सर्व गोष्टी सोप्या केल्या.
– एक साधिका (मे २०२०)
(क्रमशः)
भाग २ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/543128.html
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |