मंत्री मायकल लोबो आणि आमदार प्रवीण झांट्ये यांची भाजपला सोडचिठ्ठी
निष्ठावंतांवर भाजपने अन्याय केल्याचा मायकल लोबो यांचा आरोप
पणजी, १० जानेवारी (वार्ता.) – बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी अखेर १० जानेवारी या दिवशी सकाळी मंत्रीपद आणि आमदारकी यांचे त्यागपत्र दिले. भाजपसमवेतचे गेल्या १५ वर्षांचे संबंध तोडून त्यांनी भाजपला सोठचिठ्ठी दिली. दुसरीकडे मयेचे आमदार श्री. प्रवीण झांट्ये यांनी १० जानेवारी या दिवशी आमदारकीचे त्यागपत्र दिले. भाजपची आमदारकी सोडणारे ते ४ थे आमदार ठरले आहेत. यापूर्वी कार्लुस आल्मेदा आणि एलिना साल्ढाणा यांनी भाजपच्या आमदारकीचे त्यागपत्र दिले होते.
गोव्यात १४ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेची निवडणूक होत असल्याने राजकीय घडामोडी आता गतीमान झाल्या आहेत.
भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय ! – मायकल लोबो
भाजप सोडण्याचे कारण सांगतांना मायकल लोबो खेदाने म्हणाले, ‘‘भाजप दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेत आहे, असे मला वाटत नाही. भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. तो पक्षाबाहेरील उमेदवार आयात करत आहे. कळंगुट येथील नागरिक माझ्या या निर्णयाचा आदर करतील याची मला निश्चिती आहे.’’
पक्ष आणि सरकार यांच्याकडून अपेक्षित सहकार्य नाही ! – श्री. प्रवीण झांट्ये
भाजप सोडतांना श्री. प्रवीण झांट्ये म्हणाले, ‘‘गेल्या ५ वर्षांत पक्ष आणि सरकार यांच्याकडून मला अपेक्षित असे सहकार्य मिळाले नाही. सरकारी खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती झाली; परंतु मये मतदारसंघातील नागरिकांना नोकर्या दिल्या गेल्या नाहीत. विकासाच्या संदर्भातही मये मतदारसंघाकडे दुर्लक्ष करण्यात आले. मी मगोपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.’’
‘मगोप’चे ज्येष्ठ आमदार श्री. सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘११ जानेवारी या दिवशी श्री. प्रवीण झांट्ये रितसर मगोपमध्ये प्रवेश करणार आहे.’’
मायकल लोबो यांनी स्वार्थासाठी पक्ष सोडला ! डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
भाजप हा मोठा परिवार आहे आणि तो मातृभूमीच्या सेवेसाठी कटीबद्ध आहे. स्वार्थाचे राजकारण आणि हव्यास यांसाठी पक्षांतरे करणार्यांमुळे चांगले प्रशासन देण्याच्या आमच्या ध्येयावर कोणताच परिणाम होणार नाही. भाजपचे सुप्रशासन जनतेने गेली १० वर्षे पाहिले आहे आणि जनता भाजपला पुन्हा सत्तेवर आणणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मायकल लोबो यांनी पक्षत्याग केल्याच्या घटनेवरून बोलतांना व्यक्त केली.
भाजपला काहीच फरक पडणार नाही ! सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
मायकल लोबो हल्ली केवळ तनाने भाजपात होते आणि मनाने त्यांनी पक्ष कधीच सोडला होता. कळंगुटची जागा मिळवण्यासाठी भाजप कळंगुटला नवीन उमेदवार देणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केली.