घरी रहात असतांना आणि रामनाथी आश्रमात स्वभावदोष अन् अहं निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना देवाचे साहाय्य घेतल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती !

सौ. साधना दहातोंडे

१. घरी असतांना देवाची अनुभवलेली कृपा !

‘माझे यजमान श्री. अशोक दहातोंडे आणि माझी मुलगी कु. वेदिका (वय १५ वर्षे) साधना करण्यासाठी आश्रमात गेले होते. तेव्हा काही दिवस मी घरी एकटी असतांना अनेक वेळा गुरुकृपा अनुभवली.

१ अ. जोराचा पाऊस येणार असल्याचे देवाने दार वाजवून सुचवणे : एकदा दुपारी मला दारावर आवाज ऐकू आला. तो चांगला नाद होता; म्हणून मी दार उघडून पाहिले. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘मी बाहेर कपडे वाळत घातले आहेत आणि जोराचा पाऊस येणार आहे.’ तेव्हा मला कृतज्ञता वाटली. मी श्रीकृष्णाला विचारले, ‘भगवंता, मला झोपेतून कुणी उठवले ?’ तेव्हा देवाने सांगितले, ‘निसर्गदेवाने !’

१ आ. पाऊस येत असतांना बाहेर जाऊन खिडकी बंद करायला भीती वाटणे, भिंतीवर सूक्ष्मातून ‘ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप लिहिणे आणि खिडकीजवळ आल्यावर खिडक्यांची तावदाने आपोआप बंद होणे : एका रात्री पुष्कळ जोराचा वारा आणि ढगांचा गडगडाट चालू झाला. मी झोपलेल्या ठिकाणच्या दोन्ही खिडक्या उघड्या होत्या. खिडकीतून पाणी अन् वारा आत येत होता. मला बाहेर जाऊन खिडकी बंद करावी लागणार होती; मात्र मला बाहेर जायला भीती वाटत होती. मी भिंतीवर सूक्ष्मातून ‘ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप लिहू लागले. नंतर मी खिडकीजवळ आल्यावर खिडक्यांची तावदाने आपोआप बंद झाली.

१ इ. पाऊस, वारा आणि ढगांचा गडगडाट यांची भीती वाटू लागल्यावर नामजप करत झोपणे, मध्येच जाग आल्यावर ‘ॐ’चा नामजप चालू आहे’, असे लक्षात येणे : मी घरी एकटीच असल्याने मला पाऊस, वारा आणि ढगांचा गडगडाट यांची भीती वाटायची. त्या वेळी मी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा नामजप करत झोपायचे. मला मधूनच जाग आल्यास ‘माझा ‘ॐ’चा नामजप चालू आहे’, असे माझ्या लक्षात यायचे. ‘परात्पर गुरु ‘ॐ’च्या निर्गुण रूपाने माझ्या जवळ आहेत’, याची जाणीव होऊन मला कृतज्ञता वाटायची.

२. रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना लाभलेले देवाचे साहाय्य !

२ अ. सारणी लिखाण करतांना देवाचे साहाय्य घेतल्यावर एकाग्रतेने सारणी लिखाण करू शकणे आणि ‘देवच योग्य दृष्टीकोन सुचवत आहे’, असे जाणवणे : ‘मला रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करण्याची संधी मिळाली. आरंभी मला ही प्रक्रिया राबवण्याचा पुष्कळ ताण यायचा. मी सारणी लिखाण करतांना देवाचे साहाय्य घेण्यास आरंभ केला. एक दिवस मी सारणी लिखाण करतांना ‘माझ्या मागे कुणीतरी उभे आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मी एकाग्रतेने लिखाण करत होते; म्हणून मी मागे लक्ष दिले नाही. लिखाण पूर्ण झाल्यावर मी मागे वळून पाहिले. तेव्हा मला सावली दिसली आणि नंतर ती सावली दिसेनाशी झाली. त्या वेळी ‘देवच मला सर्व काही सुचवत होता’, हे माझ्या लक्षात आले.

२ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना निराशा आल्यावर आलेली अनुभूती

२ आ १. प्रक्रिया राबवतांना निराशा आल्यावर ‘स्वतःकडे पांढर्‍या प्रकाशाचा झोत येत असून चैतन्य मिळत आहे’, असे जाणवणे आणि मन सकारात्मक होणे : एकदा माझा व्यष्टी साधनेचा आढावा झाल्यानंतर माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष झाला. त्या वेळी ‘मला आता स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया जमणार नाही’, असे वाटून निराशा आली. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना शरण जाऊन त्यांच्या अनुसंधानात राहू लागले. त्या वेळी ‘माझ्याकडे पांढर्‍या प्रकाशाचा झोत येत असून मला चैतन्य मिळत आहे’, असे जाणवून माझे मन १०० टक्के सकारात्मक झाले आणि मी झोपी गेले.

३. त्यानंतर आतापर्यंत देवाच्या कृपेने माझा प्रक्रियेच्या संदर्भात कधीच संघर्ष झाला नाही किंवा मला निराशा आली नाही. त्यानंतर मला व्यष्टी साधनेच्या आढाव्यात आनंद मिळू लागला.’

– सौ. साधना अशोक दहातोंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.९.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक