मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर आणि आनंदी होण्यासाठी साधना अन् गुरुकृपा आवश्यक असते !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !
१. महामार्गावरून प्रवास करतांना नुकताच घडलेला अपघात पहाणे
‘एकदा महामार्गावरून जातांना मी अपघात पाहिला. आमची चारचाकी तेथे येण्याच्या अगदी १० ते १५ मिनिटे आधीच तो अपघात झाला असावा. अपघात झालेले वाहन मार्गातच पडले होते आणि त्या वाहन चालकाचा मृतदेह गाडीपासून काही अंतरावर पडलेला होता. तेथे २ – ४ माणसे भोवती गोळा झाली होती.
२. मृत पावलेल्या चालकाच्या मृतदेहाकडे लक्ष गेल्यावर सूक्ष्मातून ‘मृत व्यक्तीचा लिंगदेह तिथेच फिरत असून त्याच्या भोवती अनेक अनिष्ट शक्ती घुटमळत आहेत’, असे दिसणे
चारचाकीतून जातांना माझे लक्ष मृत पावलेल्या चालकाच्या मृतदेहाकडे गेले. त्या वेळी मी समवेत असलेल्या साधकांना सांगितले, ‘‘मला सूक्ष्मातून दिसले, ‘ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याचा लिंगदेह अजूनही त्या गाडीच्या आजूबाजूलाच फिरत आहे. त्या लिंगदेहाला अजून हे कळलेच नाही की, त्याचा मृत्यू झाला आहे. त्याला वाटत आहे की, तो अजून जिवंतच आहे. त्या वेळी लिंगदेहाच्या भोवती अनेक अनिष्ट शक्ती घुटमळत आहेत.’ बर्याचदा अनिष्ट शक्ती लगेच अशा लिंगदेहाचे नियंत्रण घेऊन त्याच्याकडून वेगवेगळी कामे करून घेतात. काही वेळा असेही आढळून येते की, अनेक मोठ्या अनिष्ट शक्तींच्या नियंत्रणात त्यांची कामे करण्यासाठी असे नुकतेच मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे लिंगदेह असतात आणि ते त्यांचे गुलाम म्हणून काम करतात.
३. साधना न करणार्या व्यक्तीचा लिंगदेह रज-तमात्मक असल्याने तो अनिष्ट शक्तींच्या तावडीत सापडून त्यांनी सांगितलेली वाईट कामे करणे आणि त्यामुळे अशा लिंगदेहाला मृत्यूनंतर गती मिळण्यात अडथळे येणे
साधना न करणारे आणि ज्यांच्यावर गुरुकृपेचे छत्र नसते, त्यांचे मृत्यूनंतर असे हाल होऊ शकतात. साधना न करणार्या जिवाच्या मनावर मायेचा, तसेच अनेक तामसिक विचारांचा संस्कार दृढ झालेला असतो. हा संस्कार तमोगुणी असल्याने अशा मृतदेहावर अनिष्ट शक्तींचे आक्रमण लगेच होते; म्हणून मृतदेहावर लगेच अंत्यसंस्कार करण्यात येतात. संरक्षककवच नसणारा असा रज-तमात्मक लिंगदेह, जर तंत्र-मंत्र साधना करणार्यांच्या तावडीत सापडला, तर ते लगेचच अशा लिंगदेहाला सिद्धींनी वश करून घेतात आणि मग त्या लिंगदेहाकडून त्यांना हवी असलेली वाईट कामे करून घेतात. अशा वशीकरण झालेल्या लिंगदेहांना स्वत:ची सुटका करून घेणे फार कठीण असते. त्यामुळे त्यांना मृत्यूनंतर पुढची गती मिळायलाही अडथळे येतात.
४. साधना करणार्या आणि गुरुकृपेचे संरक्षककवच असणार्या साधकाचा मात्र मृत्यूनंतरचा प्रवास सुखद होतो, याला कारण त्याच्यावर असलेली गुरुकृपा !
साधना करणार्या आणि सतत नामानुसंधानात असलेल्या मृत पावलेल्या जिवाच्या लिंगदेहाला ‘त्याचा मृत्यू झाला आहे’, हे दैवी शक्तीकडून लगेच कळते. त्याचे अंतर्मनही त्याला तसे सांगते. कधी कधी त्याच्या गुरूंकडूनही त्याला मृत्यूची सूचना मिळते. मृत्यूच्या प्रवासात त्याला गुरूंकडून अभय मिळते. साधना करणार्याला मृत्यूचे भय वाटत नाही; कारण त्याला या प्रवासात सांभाळणारेही त्याचे गुरुच असतात. गुरूंच्या कृपेच्या दैवी शक्तीवर तो सूक्ष्म जगातील पुढच्या प्रवासात विनाअडथळा मार्गक्रमण करू शकतो. साधना करणार्या जिवाच्या भोवती सतत देव आणि गुरु यांचे संरक्षककवच असते. त्यामुळे बाहेरील कोणत्याही अनिष्ट शक्ती त्याच्यावर आक्रमण करू शकत नाहीत, कुणीही त्याच्या लिंगदेहाला वश करू शकत नाही.
५. तात्पर्य
यावरून ‘साधना ही केवळ जिवंतपणीच आनंदी जीवन जगण्यासाठी मर्यादित नसून मृत्यूनंतरचे जीवनही आनंदी करण्यासाठी आहे’, हे लक्षात येते आणि जीवनातील गुरुकृपेचे महत्त्व पटते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |