पाकिस्तानातील मंदिरांची सद्यःस्थिती आणि हिंदूंचे हाल
पाकिस्तानमधील हिंदूंची संख्या वर्ष १९९० मधील असून आता ती संख्या त्याहूनही न्यून झाली आहे. यावरून तेथील हिंदूंची स्थिती किती भयावह असेल ?, याची कल्पना आपण करू शकणार नाही. यावरून भारतात पाकिस्तानमधून येणार्या निर्वासित हिंदूंसाठी नागरिकत्व सुधारणा कायदा किती आवश्यक आहे, हे दिसून येते. तसेच या लेखात सांगितल्यानुसार पाकिस्तानमधील हिंदु मंदिरांची सांगितलेली स्थिती आता भग्नावशेषाकडे अथवा ती पाडली गेली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकंदरित ही स्थिती पालटण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक
१. भक्त प्रल्हाद आणि श्री नरसिंह यांची घटना कुठे घडली ?
‘हिरण्यकश्यपू, भक्त प्रल्हाद आणि श्रीविष्णूचा अवतार श्री नरसिंह यांची कथा भारत भागवतादि पुराणातून गाजलेली आहे; पण ही घटना नक्की कुठे घडली ?, याविषयीचा पुरावा उपलब्ध नाही. प्रत्येक नरसिंह देवालयाच्या मागे ही घटना चिकटवलेली आपल्याला आढळते. त्यातल्या त्यात संशोधकांच्या मते ही घटना भारताच्या वायव्य भागात घडली असावी. तसे असल्यास ते स्थळ कोणते ?, तर ते स्थळ म्हणजे मुल्ताननगर !
१ अ. मुल्तान शहराची माहिती आणि नरसिंह मंदिराची सद्यःस्थिती
भारताच्या फाळणीनंतर पंजाब प्रांतातील इतर शहरांप्रमाणे मुल्तान शहरही पाकिस्तानात होते. पंजाब आणि सिंधच्या सीमेवर मुल्तान हे व्यापार आणि दळणवळण यांचे मोठे केंद्र होते. महंमद गझनीच्या स्वारीच्या वेळी (इ.स. १०२०) मुल्तान येथे एक प्रख्यात सूर्यमंदिर होते, असे तत्कालीन कागदपत्रे सांगतात. प्राचीन काळात भारतात त्या ठिकाणी सूर्यमंदिरे असल्याचा आपल्याला पुरावा मिळतो. उज्जैनीचा कालप्रिय म्हणजे सूर्य ! यमुना काठच्या कालप्रियपूर (आजचे काल्पी) येथील देवालय आणि ओडिशातील कोणार्कचे सूर्यमंदिर या स्थळाच्या बरोबरीनेच गाजलेले सूर्यमंदिर हे मुल्तानचे. या सूर्यमंदिराला महंमद गझनीची मोठी झळ लागली. याच मुल्तान शहरात किंवा त्या जागेवर हिरण्यकश्यपू वधाची घटना घडली, अशी प्राचीन आख्यायिका आहे. आज तेथील नरसिंह मंदिराची काय स्थिती आहे ?, याची एक मोठी शोककथा आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या १८ जानेवारी १९८९ च्या अंकात प्रसिद्ध झालेली बातमी अशी होती, ‘‘मुल्तान येथे असलेली प्रल्हाद देवाची प्रसिद्ध आणि प्राचीन वास्तू (देवालय) हिचे रूपांतर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात करण्यात आले होते.’’
२. महाभारत आणि रामायण यांतील प्रसिद्ध धर्मस्थळे पाकिस्तानात प्रत्यक्षात थोडीच आढळणे
अधिकृत सूत्राकडून असे कळते की, पाकिस्तान सरकारने या देवालयातून वसतिगृह स्थलांतरित केले आहे. गेल्या सहस्र वर्षांच्या घडामोडीतून जी धर्मस्थळे शेष राहिली असतील, तर ती थोडीच होत; पण सांस्कृतिक संबंध मात्र बर्याच प्रमाणात भारतीय जीवनाशी निगडित झालेले आढळतात. महाभारत आणि रामायण यांतील उल्लेखातून आढळणारे अनेक प्रदेश आज पाकिस्तानात आहेत. गांधार (पेशावर प्रांत), कैकयीचे माहेर असलेला केकंय देश (रावळपिंडी प्रांत), हस्तिनापूरच्या गादीवर शंतनु आला. त्याचा भाऊ बृहत्दृथ हा आपल्या मामाच्या मागे केकंयच्या गादीवर बसला. मद्र देशाचा राजा शल्य (सियालकोटचा जिल्हा), कुरु जांधल प्रदेश (पंजाबचा दक्षिण भाग), बाल्हिक (पाकव्याप्त काश्मीर), बौद्ध साहित्यातून गाजलेले तक्षशिलेचे प्रसिद्ध विद्यापीठ (रावळपिंडीपासून १३ मैलावर) अशी काही स्थळे सांगता येतील. महाभारतात प्रसिद्ध असलेला जयद्रथ हा तर सिंधचा राजा ! जगत्श्रेष्ठ व्याकरणी पाणिनी हा तर पेशावर प्रांतातील सालातूर या गावचा, ही सूची अजून वाढवता येण्यासारखी आहे; पण भारतभर प्रसिद्ध असलेली धर्मस्थळे मात्र पाकिस्तानात थोडीच आढळतात.
३. पाकिस्तानमधील हिंदूंचे न्यून होत चाललेले संख्याबळ
पाकिस्तानमधील मंदिरांची आज काय परिस्थिती आहे, यावर केवळ तर्कच करता येण्यासारखा आहे. फाळणीनंतर आजच्या पाकिस्तानातून सुमारे ५० लाख हिंदू-शिखांनी स्थलांतर करून भारत गाठले. पाकिस्तानात मागे राहिलेली मंदिरे ही समाजकंटकांच्या हाती पडली. त्यांची काय दशा झाली असेल, याची कल्पनाच न केलेली बरी !
स्थलांतराच्या काळात पंजाब आणि सीमा प्रदेश येथील जवळ जवळ सगळे हिंदू भारतात आले. १३ ते १४ लाख सिंधी मंडळी भारतात आली. आज पाकिस्तानात अल्पसंख्य झालेली हिंदूंची जमात शेकडा एकतरी भरील कि नाही, याची शंका वाटते. पाकिस्तानातील एकंदरीत लोकसंख्या ९ कोटीच्या घरात गेली आहे. त्यापैकी जे काही २-३ लाख हिंदू सिंध प्रांतात शेष राहिलेले आहेत, त्यांच्या संख्येवरून पाकिस्तानातील हिंदूंचे संख्याबळ लक्षात येईल.’
– सेतुमाधवराव पगडी (संदर्भ : सज्जनगड ‘दासनवमी विशेषांक ’, फेब्रुवारी १९९०)