५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बेंगळुरू (कर्नाटक) येथील कु. सान्वी भारत पाटील (वय ८ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. सान्वी भारत पाटील ही या पिढीतील आहेत !
(‘वर्ष २०२० मध्ये कु. सान्वी हिची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती.’ – संकलक)
१. वय ४ ते ५ वर्षे
१ अ. श्रीकृष्णाला आवडणार नाही; म्हणून मांसाहार न करणे : ‘सान्वी ४ वर्षांची असतांना तिच्या आजोळी (माझ्या पत्नीच्या माहेरी) गेली होती. तिथे तिला अंडी खायला दिली आणि तिला ती आवडली. हे तिने भ्रमणभाष करून मला सांगितले. तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘बाळा, अंडी खाल्लेले श्रीकृष्णाला आवडणार नाही. त्यामुळे तू ती खाऊ नकोस.’’ त्या दिवसापासून सान्वीने कधीही अंडी खाल्ली नाहीत. माझे नातेवाईक पुष्कळ वेळा तिला मांसाहार करण्याचा आग्रह करतात; परंतु ती तो करत नाही. ती त्यांना सांगते, ‘‘श्रीकृष्णाला अंडी आणि मटण खाल्लेले आवडत नाही; म्हणून मी ते खाणार नाही.’’
१ आ. धर्माचरणाची आवड
१. सान्वी न विसरता नियमित स्वतः कपाळाला कुंकू लावायची आणि तिच्या लहान बहिणीलाही लावायची. मी कधी टिळा न लावता बाहेर जात असेन, तर ती मला त्याची जाणीव करून द्यायची.
२. ती प्रतिदिन श्रीकृष्णाच्या चित्रासमोर बसून प्रार्थना करून श्लोक म्हणायची. मी कधी प्रार्थना करायला विसरलो, तर ती मला लगेच प्रार्थनेची आठवण करून द्यायची.
३. ती प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णाच्या नावाशी जोडायची, उदा. ती म्हणायची, ‘‘बाबा, ते पहा ‘श्रीकृष्णाचे फुलपाखरू’, ते पहा ‘श्रीकृष्णाचे पक्षी !’’ अजूनही ती हे सर्व करत आहे.
१ इ. सत्संगाची ओढ : आम्ही कल्याणला रहात होतो. तेव्हा ती लहान होती; म्हणून मी तिला सत्संगाला आणि सेवेला घेऊन जायचो. तिला माझ्या समवेत यायला आवडायचे. ती सत्संग संपेपर्यंत शांत बसायची.
१ ई. सान्वीला आलेली अनुभूती – नामजप करतांना ‘श्रीकृष्ण वरवर घेऊन जात आहे’, असे वाटणे : सान्वी ५ वर्षांची असतांना एकदा नामजप करत बसली होती. पुष्कळ वेळ झाला, तरी ती नामजप करत होती. तिच्या शाळेची वेळ झाली, तरी ती नामजपातून उठत नव्हती; म्हणून तिच्या आईने तिला उठवले. तेव्हा ती आईला म्हणत होती, ‘‘आई, मला नामजप करू दे; कारण श्रीकृष्ण मला वरवर घेऊन जात आहे.’’
२. वय ६ ते ७ वर्षे
२ अ. नीटनेटकेपणा : सान्वीला घरात कचरा पडलेला आवडत नाही. ती लगेच स्वच्छता करते. तिला सांगितलेली सर्व कामे ती लगेच करते.
२ आ. ज्या वेळी माझी पत्नी मला सेवेला जातांना विरोध करते, त्या वेळी सान्वी आईला सांगते, ‘‘आई, बाबांना सेवेला जाऊ दे. ते श्रीकृष्णाची सेवा करत आहेत.’’
२ इ. जेव्हा मी पत्नीशी ओरडून बोलतो, तेव्हा सान्वी मला ओरडू देत नाही आणि सांगते, ‘‘बाबा, असे ओरडून बोललेले श्रीकृष्णाला आवडत नाही.’’
२ ई. सान्वी तिच्या लहान बहिणीवर न रागावता तिला समजून घेते.
२ उ. हिंदु धर्माप्रमाणे वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रबोधन करणे : सान्वीला मेणबत्ती फुंकून किंवा केक कापून वाढदिवस साजरा करायला आवडत नाही. ती नातेवाईक किंवा शेजारी यांच्याकडे वाढदिवसाला गेल्यावर तिथे केक कापतांना पाहिल्यास ‘वाढदिवसाला केक न कापता औक्षण करायचे असते’, असे सांगून प्रबोधन करते.
२ ऊ. सात्त्विक पोशाखाची आवड : सान्वी जीन्स पँट, टी शर्ट इत्यादी घालत नाही. तिला गोपींसारखा (घागरा-चोळी) पोशाख आवडतो. ती तिच्या आईलाही सात्त्विक कपडे घालण्यास सांगते. दूरचित्रवाणीवर तोकडे कपडे घातलेल्या मुली पाहिल्यावर ती मला म्हणते, ‘‘बाबा, हे श्रीकृष्णाला आवडत नाही ना ?’’
२ ए. ‘श्रीकृष्णाची गोपी’ बनण्याचे आणि मीरेसारखी भक्ती करण्याचे ध्येय ठेवणारी सान्वी ! : सान्वीला श्रीकृष्णाविषयी पुष्कळ प्रेम वाटते. त्यामुळे ‘मला श्रीकृष्णाची गोपी बनायचे आहे’, असे ती सतत म्हणत असते. ‘तू मोठी झाल्यावर कोण होणार ?’, असे तिला कुणी विचारले, तर ती ‘मी श्रीकृष्णाची गोपी होणार आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या आश्रमात जाणार’, असे सांगते. दूरचित्रवाहिनीवरील कृष्ण आणि गोपी यांचे नृत्य पाहून तिच्यात नृत्य करायची आवड निर्माण झाली आहे.
एकदा मी तिला ‘संत मीराबाई’ यांच्या जीवनावरील एक जुना चित्रपट दाखवला होता. तेव्हा तिच्या मनात ‘संत मीराबाई’ यांच्याविषयी पुष्कळ कुतूहल निर्माण झाले. तो चित्रपट तिने पुनःपुन्हा पाहिला. नंतर ती म्हणू लागली, ‘‘मला संत मीरेसारखी भक्ती करायची आहे.’’
३. सान्वीमधील स्वभावदोष : हट्टीपणा आणि उलट बोलणे.’
– श्री. भारत बाळासाहेब पाटील (कु. सान्वीचे वडील), बेंगळुरू, कर्नाटक. (२८.९.२०१९)