भारतातील रस्ते अपघातांचे भीषण वास्तव !
जागतिक बँकेच्या वर्ष २०१९ च्या अहवालानुसार जगातील एकूण रस्ते अपघातांमधील सर्वाधिक ११ टक्के मृत्यूंचे प्रमाण एकट्या भारतात आहे. जगातील एकूण वाहनांपैकी केवळ १ टक्का वाहने भारतात आहेत. असे असूनही ‘रस्त्यांवरील अपघातांमध्ये भारतातील प्रमाण सर्वाधिक असणे’, हा खरोखरच चिंतेचा विषय आहे. ‘भारतात मागील १० वर्षांत रस्ते अपघातांमुळे १३ लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ५० लाखांहून अधिक जण घायाळ झाले आहेत’, असे जागतिक बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातील रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. यातून बाहेर पडण्यासाठी भारतातील वाहतूक धोरणांमध्ये आमूलाग्र पालट करणे आवश्यक आहे !
संकलक – श्री. नीलेश देशमुख, नवी मुंबई
सार्वजनिक वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१७ मध्ये महाराष्ट्रात एकूण १८ सहस्र ७३० अपघात झाले. यांमध्ये एकूण ६ सहस्र ३९४ जणांचा मृत्यू झाला, तर १६ सहस्र ८०१ जण घायाळ झाले. वर्ष २०१८ मध्ये महाराष्ट्रात एकूण १८ सहस्र ८८० अपघात झाले. यांमध्ये एकूण ६ सहस्र ९८७ जणांचा मृत्यू झाला, तर १७ सहस्र ८१ जण घायाळ झाले.
१. रस्त्यांवरील अपघातांमध्ये भारताने चीनलाही मागे टाकले !
संपूर्ण जगातील रस्त्यांवरील अपघातांमध्ये वर्ष २००५ मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर वर्ष २००६ ते २०१४ या कालावधीत रस्त्यांवरील अपघातांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर पोचला आहे. वर्ष २०१४ मध्ये चीनमध्ये रस्त्यांवरील एकूण ४७ सहस्र ७२४ अपघात झाले, तर भारतात ४ लाख ८९ सहस्र ४०० रस्त्यांवरील अपघात झाले, त्यामध्ये १ लाख ३९ सहस्र ६७१ लोक मृत्यूमुखी पडले. चीनची लोकसंख्या भारताहून अधिक असतांना भारतात मात्र अपघातांचे प्रमाण पुष्कळ वाढले.
२. वाहनांची पडताळणी आणि ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ (टीप) निश्चित करणे आवश्यक !
(टीप – ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ म्हणजे कालबाह्य झालेली वाहने मोडीत काढण्याविषयीची धोरणे)
रस्त्यांवरील अपघातातून वाचण्यासाठी एक पायाभूत साचा सिद्ध करणे आवश्यक आहे. वाहनांची दुरवस्था हे अपघाताचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे वाहनांची वेळच्या वेळी संपूर्ण पडताळणी व्हावी, यासाठी एक कार्यप्रणाली निश्चित करणे आवश्यक आहे. ज्यातून वाहनांचे आरोग्य पडताळून त्यांचे आयुष्यमान आणि क्षमता ठरवता येईल. यामुळे रस्त्यावरून योग्य क्षमतेची वाहनेच धावतील. यासह कालबाह्य आणि जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ योग्यपणे राबवणे आवश्यक आहे.
३. महामार्ग सिद्ध करतांना अपघातग्रस्तांना त्वरित उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालयांचीही व्यवस्था आवश्यक !
अपघात झाल्यानंतर पुढील २० मिनिटे महत्त्वाची असतात. तात्काळ वैद्यकीय साहाय्य मिळाले, तर गंभीर रुग्णाचेही प्राण वाचू शकतात. त्यामुळे महामार्ग किंवा मोठे रस्ते यांच्या शेजारी आधुनिक रुग्णालये असावीत. त्यामुळे अपघातग्रस्तांना अल्प वेळेत रुग्णालयात भरती केल्याने त्यांचे प्राण वाचतील.
४. रस्त्यांवरील अपघातांची काही प्रमुख कारणे !
अ. वाहन चालवतांना एकाग्रता नसणे
आ. अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवणे
इ. बेजबाबदारपणे वाहन चालवणे
ई. खराब रस्ते
उ. सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणे
ऊ. वाहन चालवतांनाचे नियम मोडणे (उदा. पुढच्या वाहनाला वळसा घालून वाहन वेगात पुढे नेणे)
ए. प्राणी रस्त्यात येणे
ऐ. वाहनांचे ब्रेक न लागणे
ओ. दुचाकीवरून पडणे आणि मागून वाहने येणे
अशी काही अपघाताची विविध कारणे असतात. (विशेषतः घाटात किंवा काही चौकांमध्ये ठराविक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात. त्यामागे आध्यात्मिक म्हणजे सूक्ष्मातील कारणेही असू शकतात; पण दुर्दैवाने याविषयी अज्ञान असल्याने किंवा कुणी विश्वास ठेवत नसल्याने केवळ स्थुलातील उपाययोजना करण्याकडे सरकार किंवा प्रशासन यांचा कल असतो. – संकलक)
५. ‘वाहन चालवण्याच्या नियमांचे सर्रास उल्लंघन’ ही देशाची शोकांतिका !
दुर्दैवाने भारतातील अनेक नागरिक बेशिस्तपणे वाहन चालवतात. अनेकांना शिरस्त्राण (हेल्मेट) घालणे, सिग्नल पाळणे, चारचाकीत पुढच्या आसनावर बसल्यावर लावायचा पट्टा लावणे यांमध्ये कमीपणा वाटतो. अनेकजण वाहतुकीचा परवाना, प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्र (पी.यू.सी.) किंवा विमा जवळ नसतांना निर्धास्तपणे वाहने चालवतात. पाल्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच अनेक पालक त्यांना वाहन चालवण्यास देतात. नागरिकांना वाहतूक कायद्यांची भीती वाटत नाही. वाहनाची काळजी घेण्याविषयी अनेक जण हेळसांड करतात.
६. रस्ते सुरक्षा पंधरवडा पाळतात; वाहतुकीचे नियम नाही !
रस्ते अपघातांचा धोका ओळखून संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष २०११ ते २०२० हा कालावधी रस्ते सुरक्षेसाठी ठोस कृती करण्याचे दशक म्हणून घोषित केले होते; आम्ही मात्र अपघातातील मृतांची आकडेवारी मागील वर्षापेक्षा न्यून आहे, यातच धन्यता मानत आलो आहोत. आपल्याकडे रस्ते सुरक्षा सप्ताह आणि पंधरवडा पाळले जातात; परंतु सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत, अशी परिस्थिती आहे.
७. शालेय दशेपासूनच वाहतुकीचे नियम बिंबवणे !
देशातील शाळा, महाविद्यालये किंवा विद्यापीठ यांमध्ये वाहतूकविषयक शिक्षण दिले जात नाही. असे शिक्षण असले तर वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व विद्यार्थी दशेपासूनच बिंबवले जाईल. संवेदनक्षम चालक घडवायचे असतील, तर १४ ते २५ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींवर वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व बिंबवणे आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम आणि कायदे आदींचा शाळेतच अभ्यास व्हायला हवा.
८. वाहन अपघातांसाठी चालकच उत्तरदायी !
वाहतुकीच्या अपघातांसाठी शेवटी चालक उत्तरदायी असतो. तांत्रिक बिघाडामुळे अपघात होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. आपल्याकडे कुणीही उठतो आणि चालक होतो. महामार्गावर गाडी कशी चालवावी ? याचे प्रशिक्षण दिले जात नाही. फारच थोडी आस्थापने असे प्रशिक्षण देतात. ९० टक्के चालक हे प्रशिक्षणाविनाच महामार्गावर गाडी आणतात आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात. महामार्गावरील ७५ टक्के अपघात मानवी चुकीमुळेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘चालकाला मुळीच विश्रांती न मिळणे’, हे अनेक अपघातांमधील एक प्रमुख कारण आहे. परदेशात मात्र चालकाच्या कामाचे घंटे, किती वेळ गाडी चालवावी ? याचे प्रमाण ठरलेले असते. त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा गाडीमध्ये लावलेली असते.
९. चालक प्रशिक्षणाविषयी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाची उल्लेखनीय आणि अभिनंदनीय कृती !
शासनाच्या विविध विभागांतील पदांसाठी चालकांची नियुक्ती करण्यात येते. अनेक खासगी क्षेत्रातही वाहन चालकांना संधी असते. याविषयी ‘यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठा’ने एक स्वतंत्र अभ्यासक्रम सिद्ध केला आहे. त्यामुळे काही खासगी आस्थापनांनीही असे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला आहे. तीन मासांचा हा अभ्यासक्रम रस्ते अपघातांचे प्रमाण निश्चितच घटवेल. असे अभ्यासक्रम अन्य विद्यापिठांमध्येही होणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या व्यावसायिक प्रशिक्षणामुळे एक प्रकारची सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढून रस्ते अपघातांचे प्रमाण न्यून होईल.
(संदर्भ : विविध संकेतस्थळे)
भारतातील महत्त्वाच्या राज्यांतील रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण (वर्ष २०१८)
ही आकडेवारी वर्ष २०१८ मधील आहे. त्यात वाढ झालेली असू शकते.
|