अन्वेषणासाठी पुणे पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगाव येथे आले !
जळगाव मराठा विद्या प्रसारक संस्थेचे वादाचे प्रकरण
पुणे – भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक जळगाव येथे ९ जानेवारीच्या पहाटे आले आहे. जळगाव येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगाव येथे आले आहे. पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची ५ पथके सिद्ध करण्यात आली असून या पथकाकडून स्वतंत्ररित्या चौकशी करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण ?
जळगाव येथील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईटे गटाला साहाय्य करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांचे समर्थक यांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केली आहे, अशी तक्रार अधिवक्ता विजय पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर पुणे येथील कोथरूड पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी २०१८ ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडला होता; परंतु त्यांनी तक्रार विलंबाने केली आहे. या प्रकरणी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक, नीलेश भोईटे यांच्यासह एकूण २९ जणांवर निंभोरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.