‘रज-तम प्रधान ठिकाणी गेल्यावर त्रास होऊ नये’, यासाठी साधकांनी पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावेत !
साधकांना सूचना !
‘काही साधकांना स्मशान किंवा अन्य रज-तम प्रधान ठिकाणी वैयक्तिक कारणांसाठी किंवा समष्टी सेवेसाठी जावे लागते. अशी ठिकाणे रज-तम प्रधान असल्यामुळे या ठिकाणी गेल्यावर साधकांवर पुष्कळ प्रमाणात त्रासदायक (काळे) आवरण येते आणि त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा आध्यात्मिक स्वरूपांचे त्रास होऊन साधनाही व्यवस्थित करता येत नाही. ‘साधकांना वरीलप्रमाणे त्रास होऊ नयेत’, यासाठी त्यांनी पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावेत.
१. साधकांनी रज-तम प्रधान ठिकाणी जाण्यापूर्वी करायचे उपाय
१ अ. साधकांनी परिधान करायची वस्त्रे चैतन्याने भारित करणे : साधक रज-तम प्रधान ठिकाणी जातांना जी वस्त्रे परिधान करणार असतील, ती त्यांनी भारित करून परिधान करावीत. वस्त्रे भारित करण्यासाठी धुतलेल्या वस्त्राला थोडा वेळा उन्हात ठेवावे. त्यानंतर या वस्त्रांमध्ये दैनिक सनातन प्रभात, देवतांची सात्त्विक चित्रे, नामपट्ट्या किंवा कापराची वडी घालून ही वस्त्रे रिकाम्या खोक्यात ठेवावीत. अशा प्रकारे चैतन्याने भारित केलेली वस्त्रे परिधान केल्यामुळे साधकांच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांभोवती सात्त्विकता अन् चैतन्य यांचे संरक्षककवच निर्माण होते.
१ आ. साधकांनी देवतांची चित्रे किंवा नामपट्ट्या कापडी पिशवीत घालून ती वस्त्रांना आतमध्ये लावून ती चित्रे किंवा नामपट्ट्या अनाहतचक्र आणि मणिपूरचक्र या ठिकाणी पुढे अन् पाठीमागे येतील अशा प्रकारे लावणे : साधकांनी देवतांची चित्रे किंवा नामपट्ट्या कापडी पिशवीत घालून ती वस्त्रांना आतमध्ये लावून ती चित्रे किंवा नामपट्ट्या अनाहतचक्र आणि मणिपूरचक्र या ठिकाणी पुढे अन् पाठीमागे येतील अशा प्रकारे लावावीत. त्यामुळे देहाभोवती संरक्षककवच निर्माण होऊन रज-तम प्रधान ठिकाणी असणार्या त्रासदायक शक्तीच्या आक्रमणापासून साधकांचे रक्षण होण्यास साहाय्य होते.
१ इ. साधकांनी प्राणवहन पद्धतीनुसार नामजप शोधून करणे : रज-तम प्रधान ठिकाणी जाण्यापूर्वी प्राणवहन पद्धतीनुसार नामजप शोधून तो मनातल्या मनात चालू करावा किंवा भ्रमणभाषमध्ये ध्वनीमुद्रित करून तो ऐकावा.
२. साधकांनी रज-तम प्रधान ठिकाणी गेल्यानंतर करायचे उपाय
२ अ. साधकांनी संतांच्या आवाजातील भजने किंवा दैवी नाद ऐकणे : प.पू. भक्तराज महाराजांची भजने किंवा दैवी नाद भ्रमणभाषमध्ये बारीक आवाजात लावून सोबतच्या पिशवीत ठेवावेत. भजने किंवा दैवी नाद यांतील चैतन्यमय नादलहरींमुळे साधकांच्या भोवतीच्या वातावरणाची शुद्धी होऊन साधकांच्या भोवती सात्त्विक नादलहरींचे संरक्षककवच निर्माण होण्यास साहाय्य होते.
२ आ. साधकांनी प्राणवहन पद्धतीने शोधलेला नामजप करणे किंवा नवीन नामजप शोधून करणे : अशा ठिकाणी जाण्यापूर्वी प्राणवहन पद्धतीने शोधलेला नामजप करावा. या नामजपामुळे सूक्ष्मातून होणारा त्रास न्यून होत नसेल, तर पुन्हा प्राणवहनपद्धतीने नामजप शोधून तो ऐकावा किंवा मनातल्या मनात करावा. त्यामुळे साधकांकडे देवतेचे तत्त्व आणि चैतन्य आकृष्ट होऊन साधकाभोवती दैवी शक्तीचे संरक्षककवच निर्माण होते. त्यामुळे साधकाला रज-तम प्रधान ठिकाणी असणारा आध्यात्मिक त्रास अल्प प्रमाणात होतो.
२ इ. साधकांनी मुखपट्टी (मास्क) धारण करण्यापूर्वी करायचे उपाय : साधकांनी धारण करण्याची मुखपट्टी स्वच्छ धुवून उन्हात ठेवावी. जेव्हा ती उन्हाने वाळेल, तेव्हा तिच्या आतील बाजूला अत्तर किंवा कापराची पूड लावून ती घालावी. त्यामुळे श्वासावाटे चैतन्यमय सुगंध देहात जाऊन श्वसनमार्ग मोकळा होऊन देहाच्या आतपर्यंत चैतन्य पसरते. अशा प्रकारे मुखपट्टी लावल्यामुळे साधकांना आध्यात्मिक लाभ होऊन त्यांना होणारे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्वरूपांचे त्रास न्यून होण्यास साहाय्य होते. अन्य वेळीही साधकांना मुखपट्टी, म्हणजे मास्क घालावा लागतो. त्यामुळे साधक अन्य वेळीही मुखपट्टी धारण करण्यापूर्वी हे उपाय करू शकतात.
३. साधकांनी रज-तम प्रधान ठिकाणाहून जाऊन आल्यानंतर करायचे उपाय
३ अ. साधकांनी गोमूत्र, विभूती किंवा कापूर घातलेल्या पाण्याने डोक्यावरून अंघोळ करणे : अशा ठिकाणी जाऊन आल्यावर साधकांनी घरी किंवा आश्रमात डोक्यावरून गोमूत्र, विभूती किंवा कापूर घातलेल्या पाण्याने डोक्यावरून पाणी ओतून स्नान करावे. त्यामुळे साधकांच्या देहातील सप्त कुंडलिनीचक्रे, नवद्वारे, स्थूल देह आणि सूक्ष्म देह यांच्यावर आलेले त्रासदायक आवरण आपमय चैतन्यलहरींच्या स्पर्शामुळे दूर होते. त्यामुळे साधकांना स्थूल किंवा सूक्ष्म स्तरावर जाणवणारा जडपणा किंवा मरगळ किंवा निरुत्साह दूर होऊन हलकेपणा जाणवतो.
३ आ. साधकांनी अंघोळीनंतर धुतलेले आणि देवतांच्या सात्त्विक नामपट्ट्या अन् कापूर यांतील चैतन्याने भारित केलेले वस्त्र परिधान करणे : धूत वस्त्राची सात्त्विकता वापरलेल्या वस्त्रापेक्षा अधिक असल्यामुळे साधकांनी स्नान केल्यानंतर धुतलेले आणि देवतांच्या सात्त्विक नामपट्ट्या अन् कापूर यांतील चैतन्याने भारित केलेले वस्त्र परिधान करावे. त्यामुळे वस्त्रातील सात्त्विक लहरी देहात प्रविष्ट झाल्याने साधकांच्या देहातील रज-तम लहरींचा प्रभाव न्यून होऊ लागतो आणि साधकाला होणारा त्रास अल्प होऊ लागतो.
३ इ. साधकांनी उन्हाचे उपाय करणे : त्यानंतर साधकांनी १५ – २० मिनिटे सोसवेल अशा उन्हात बसून नामजपादी उपाय करावेत. उन्हात बसल्यामुळे साधकांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांवर सौरऊर्जेतील सात्त्विकता, मारक शक्ती आणि चैतन्य यांचा वर्षाव होऊन त्यांच्या भोवतीचे सूक्ष्म स्तरावरील त्रासदायक शक्तीचे आवरण पुष्कळ प्रमाणात नष्ट होते अन् देहामध्ये सात्त्विक शक्ती कार्यरत होते. त्यामुळे साधकाला होणारे विविध प्रकारचे त्रास दूर होतात.
४. एवढे उपाय करून साधकांचा त्रास न्यून होत नसेल, तर त्यांनी पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आवश्यक
४ अ. मीठपाण्याचे उपाय करणे : खडेमीठ घातलेल्या पाण्यात दोन्ही पाय १५ – २० मिनिटे बुडवावेत.
४ आ. खोक्याचे उपाय करणे : मोठ्या रिकाम्या खोक्यात दोन्ही पाय ठेवून १५ – २० मिनिटे बसावे. त्यामुळे खोक्यातील पोकळीमध्ये पायातील त्रासदायक शक्ती खेचली जाऊन पाय किंवा अंग जड होणे किंवा दुखणे यांसारखे त्रास न्यून होतात.
४ इ. उदबत्तीने आवरण काढणे : वरील उपायांच्या व्यतिरिक्त साधकांनी मोरपिस किंवा उदबत्ती स्वत:भोवती फिरवून देह आणि कुंडलिनीचक्रे यांच्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढावे.
४ ई. कापूर, तुरटी किंवा नारळ यांनी प्रत्यक्ष किंवा मानसरित्या दृष्ट काढणे : साधकांनी स्वत:वरून कापराची वडी आपल्या समोरच्या आणि पाठीमागच्या बाजूने ओवाळून नंतर ती नारळाच्या करवंटीत ठेवून पेटवावी किंवा साधकांनी अन्य साधक किंवा कुटुंबीय यांना नारळाच्या करवंटीत ठेवलेल्या पेटत्या कापराने स्वत:ची दृष्ट काढण्यास सांगावे. साधक त्यांच्या कुटुंबियांना किंवा अन्य साधकांना नारळाने किंवा तुरटीने दृष्ट काढण्यास सांगू शकतात. जर प्रत्यक्ष दृष्ट काढणे शक्य नसेल, तर साधकांनी हनुमानाला प्रार्थना करून त्याला मानसरित्या स्वत:ची दृष्ट काढण्यास सांगावे.
४ उ. प्राणशक्तीवहन पद्धतीने शोधलेला नामजप करणे किंवा नवीन नामजप करणे : आधीच्या नामजपाने लाभ होत नसेल, तर पुन्हा प्राणशक्तीवहन पद्धतीने नामजप शोधून तो ऐकावा किंवा मनातल्या मनात करावा.
वरील उपायांच्या व्यतिरिक्त साधकांनी अत्तर लावून त्याचा सुगंध घेणे आणि कापराची पूड करून कापूर हुंगणे हे उपायही करावेत. तरीही बरे वाटत नसेल, तर साधकांनी उत्तरदायी साधक किंवा संत यांना सूक्ष्मातील त्रास न्यून होण्यासाठी नामजपादी उपाय विचारून घ्यावेत.’
कृतज्ञता
‘हे भगवंता, तुझ्या कृपेमुळेच मला रज-तम प्रधान ठिकाणी गेल्यावर होणार्या सूक्ष्म स्तरावरील त्रासांपासून रक्षण होण्यासाठी कोणते आध्यात्मिक उपाय करायला हवेत ? हे कळले’, यासाठी मी तुझ्या पावन चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१२.२०२१)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |