हिंदु तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी धर्मांधाला फाशीची शिक्षा द्या !

सिन्नर (जिल्हा नाशिक) येथे ‘लव्ह जिहाद’च्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

सिन्नर (जिल्हा नाशिक) – येथील ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या पीडित तरुणीच्या मृत्यूप्रकरणी धर्मांध रईस इब्राहिम शेख याला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच त्याला साहाय्य करणार्‍या पोलिसांचे निलंबन करावे, अशी मागणी करत शहर आणि तालुक्यातील नागरिकांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ७ जानेवारी या दिवशी शहरातून मोर्चा काढला. पीडितेला न्याय मिळावा यासाठी सहस्रो नागरिक या मोर्च्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या घटनेतील संशयित आरोपी धर्मांध रईस इब्राहिम शेख या नराधमावर कलम ३०२ आणि ३७६ प्रमाणे गुन्हे नोंद करून त्याला शिक्षा द्यावी आणि पीडित तरुणीला न्याय द्यावा, अशीही मागणी मोर्च्यामध्ये करण्यात आली. या वेळी रईस इब्राहिम शेख आणि ‘लव्ह जिहाद’ यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

१. या वेळी भाजपच्या आमदार सीमा हिरे, शिवसेनेचे नेते उदय सांगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समाधान गायकवाड, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजाराम मुरकुटे, तसेच गिरीश पालवे, सुनील बच्चाव, भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड यांच्यासह शेकडो नागरिक मोर्च्यामध्ये सहभागी झाले होते. येथील एका २१ वर्षीय तरुणीने २८ डिसेंबर २०२१ या दिवशी आत्महत्या केली; मात्र ही ‘आत्महत्या’ नसून ‘लव्ह जिहाद’मुळे तिला हे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले, असे समोर येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता.

२. उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, उपअधीक्षक सोमनाथ तांबे, तहसीलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार आदींनी मोर्च्यातील नागरिकांशी चर्चा करून दोषींना कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले.

३. पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार असल्याचे भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी या वेळी सांगितले, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा गंभीर प्रकार मांडणार असल्याचे त्या म्हणाल्या.

घटनेचे अन्वेषण करणारा अधिकारी पालटला !

पीडित तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलीस यंत्रणेच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त झाल्याने पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडून या प्रकरणाचे अन्वेषण काढून घेण्यात आले असून यापुढे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे हे या प्रकरणाचे अन्वेषण करणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी सांगितले. यापुढे या घटनेच्या अन्वेषणामध्ये स्थानिक पोलिसांचा हस्तक्षेप रहाणार नसल्याचे कांगणे यांनी स्पष्ट केले.

धर्मांध रईस शेख याचे वकीलपत्र कुणीही न घेण्याविषयी सर्वपक्षियांचे निवेदन !

या वेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने सिन्नर बार कौन्सिलला धर्मांध रईस शेख याचे वकीलपत्र कुणीही न घेण्याचे निवेदन देण्यात आले.