परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने संतपदी विराजमान झाल्यावर सनातनच्या ११६ व्या संत पू. (सौ.) माला संजीव कुमार (वय ६७ वर्षे) यांनी त्यांच्या चरणी वाहिलेले पत्ररूपी कृतज्ञतापुष्प !
परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले),
आपल्या चरणी माझा सादर प्रणाम आणि कोटीशः कृतज्ञता !
१. ‘साधनेतील प्रगती विहंगम मार्गानेही होते’, हे गुरुदेवांच्या कृपेने अनुभवता येणे
‘साधना आणि साधनेतील प्रगती विहंगम मार्गानेही होते’, हे मी केवळ आपल्या ग्रंथांमध्ये वाचले होते. आता मी ते स्वतः प्रत्यक्ष अनुभवत आहे. जुलै २०२१ मध्ये आमची (माझी आणि माझे यजमान पू. संजीव कुमार यांची) आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती. आता डिसेंबर २०२१ मध्ये आमची आध्यात्मिक पातळी वाढून ती ७१ टक्के झाली. ‘आमची एवढी जलद आध्यात्मिक प्रगती होईल’, असा विचारही मी कधी करू शकत नव्हते. गुरुदेव, आपल्या कृपेने आम्ही संतपद गाठले. तेव्हा मला वाटले, ‘गुरुदेव सर्वकाही करू शकतात.’
२. ‘परमेश्वरी कृपेला अंत नसतो’, हे अनुभवणे
गुरुदेव, प्रथम माझ्या मनात ‘मी आपल्याला अपेक्षित अशी साधना करत नाही, तर संत कशी झाले ?’, असे पुष्कळ विचार आले. नंतर माझ्या लक्षात आले, ‘परमेश्वराची दया आणि कृपा याला अंत नसतो !’
३. रामनाथी आश्रमात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव होत असल्याचे अनुभवणे आणि तो घेण्यासाठी झोळी अपुरी पडल्याचे जाणवणे
परात्पर गुरुदेव, आम्ही वैकुंठातून (रामनाथी आश्रमातून) घरी परत आलो. तेव्हापासून माझ्या डोळ्यांसमोरून आपला हसरा तोंडवळा दृष्टीआड होत नव्हता. आपण आम्हाला आश्रमात अगदी फुलासारखे ठेवले. सर्व साधकांच्या माध्यमातून आपण आमच्यावर प्रीतीचा वर्षाव करत होतात. गुरुदेव, एवढी प्रीती मी आजपर्यंत कधी अनुभवली नव्हती. तेथे आमच्यावर जणू आपल्या कृपेचा वर्षाव होत होता. ते सर्व आम्ही आमची झोळी भरभरून घेऊन परत आलो आहोत; परंतु गुरुदेवा, आपली एवढी कृपा आहे की, आमची झोळी अपुरीच पडली.
‘आपल्याविषयी पुष्कळ काही लिहीत रहावे’, असे मला अंतःकरणापासून वाटते; परंतु आपला वेळ अमूल्य आहे. ‘माझे पत्र वाचण्यात आपला वेळ व्यर्थ जाऊ नये’, यासाठी मी येथेच विराम घेते.
– आपली कन्या,
( ‘आपले सर्व लिखाण लवकरात लवकर लिहून पाठवावे, हीच एक विनंती. आमची कन्या संत झाली; म्हणून मला आनंद झाला ! ’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३१.१२.२०२१)
(पू.) सौ. माला कुमार, देहली (२५.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |