‘अश्वगंधा’ संशोधन प्रकल्पात नागरिकांना सहभागी होण्याची संधी !
आयुष मंत्रालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा उपक्रम
पुणे – ‘अश्वगंधा’ या औषधी वनस्पतीची कोवीड लसीकरणानंतरची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी चालू असणार्या आयुष मंत्रालयाच्या संशोधनात सामान्य नागरिकांना सहभागी होण्याची संधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाने उपलब्ध करून दिली आहे. हा प्रकल्प आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्पांचा एक भाग आहे. पुणे, मुंबई, नागपूर, देहली, हसन, बेळगाव आणि जयपूर या ठिकाणी हा प्रकल्प चालू आहे.
या संशोधन प्रकल्पाचे पुण्यातील केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात असून या केंद्रात लसीकरण झालेल्या १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना या अभ्यासात सहभागी करून घेण्यात येत आहे. या प्रकल्पात सहभागी नागरिकांना लस घेतल्यानंतर ‘अश्वगंधा’च्या गोळ्या देण्यात येतील. त्या गोळ्या घेतल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती ही केवळ लस घेणार्यांच्या तुलनेत किती वाढली ? याचा अभ्यास केला जाईल. ‘अश्वगंधा’ ही औषधी अनेक आजारांवर उपयुक्त आहे, असे या आधीच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
आयुष मंत्रालयाचे राष्ट्रीय संशोधक प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले की, आयुर्वेदिक औषधींची उपयुक्तता पटवून देण्यासाठी आणि त्यांचा अधिक प्रचार, प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे देशपातळीवरील संशोधन प्रकल्प हे आयुष मंत्रालयाने हाती घेतले आहेत. अश्वगंधाविषयीचे शास्त्रशुद्ध संशोधन हा त्याचाच एक भाग आहे. अधिकाधिक नागरिकांनी या संशोधनात सहभागी होऊन आयुर्वेदाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत.