मुंबई उपनगरांतील कांदिवली, बोरिवली आणि दादर येथे पाऊस !

मुंबई, ८ जानेवारी (वार्ता.) – गेल्या २ दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असतांना ८ जानेवारी या दिवशी सकाळी कांदिवली, बोरिवली आणि दादरच्या काही भाग येथे पावसाचा जोर आढळून आला. शहरात कधी उष्ण वातावरण आणि कधी कडाक्याची थंडी, असा वातावरणात पालट होत असतांनाच त्यात आता पाऊस पडल्यामुळे सर्दी आणि खोकला यांचा मुंबईकरांना त्रास होण्याची शक्यता आहे.

सध्या कोरोनानेही मुंबईत थैमान घातले आहे. त्यामुळे या सततच्या पालटत्या वातावरणाचा प्रभाव मुंबईकरांच्या आरोग्यावर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आधुनिक वैद्यांनी केले आहे.

मुंबईत झालेल्या या पावसानंतर किमान तापमान १९ अंश सेल्सियसवर नोंदवले गेले. ८ जानेवारी या दिवशी थंडीचा प्रभाव अधिक होता. ज्यांना दमा आहे अशा नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण दमा असणार्‍या नागरिकांना अचानक पालटलेल्या वातावरणाचा त्रास अधिक होण्याची भीती असते, असे आधुनिक वैद्यांकडून सांगण्यात आले आहे.