विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून केले जाईल ! – के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विजयदुर्ग किल्ला आणि समुद्रकिनार्याची स्वच्छता
सिंधुदुर्ग (जि.मा.का) – विजयदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि परंपरा येथे येणार्या प्रत्येक पर्यटकाला कळण्यासाठी निश्चितपणे या किल्ल्याचे संवर्धन पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी विजयदुर्ग येथे दिली.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पाणी आणि स्वच्छता मोहीम कक्ष आणि विजयदुर्ग ग्रामपंचायत यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त ७ जानेवारी या दिवशी देवगड तालुक्यातील रामेश्वर मंदिर ते विजयदुर्ग धक्का (जेटी)पर्यत दुचाकी फेरी आणि जेटी ते विजयदुर्ग किल्ला पर्यत स्वच्छता फेरी काढण्यात आली. त्यानंतर विजयदुर्ग किल्ला आणि येथील समुद्र किनारा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
(सौजन्य : Kokanshahi)
या मोहिमेत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, रामेश्वर गावचे सरपंच विनोद सुके, विजयदुर्गचे उपसरपंच महेश बिडये आणि विजयदुर्ग गावचे सरपंच प्रसाद देवधर आदींचा सहभाग होता.
७ जानेवारी या दिवशी सकाळी ९ वाजता श्री देव रामेश्वर मंदिर ते विजयदुर्ग जेटीपर्यंत दुचाकी फेरी काढण्यात आली. त्यानंतर विजयदुर्ग जेटी ते विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत स्वच्छता फेरी काढण्यात आली. या फेरीत रामेश्वर हायस्कूल आणि विजयदुर्ग माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. यानंतर कोरोनाविषयी जागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले, तर महिला बचतगटाने ‘विजयदुर्ग किल्ला’ या विषयावरील नाटिका सादर केली.
या प्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘विजयदुर्ग किल्ला हा आपल्या इतिहासाचा, तसेच परंपरांचा गौरव स्तंभ आहे. या इतिहासाची आणि गौरवशाली परंपरांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठीच आजचा हा कार्यक्रम विजयदुर्ग किल्ल्यावर घेण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. सामाजिक अंतराचे पालन करावे.’’
विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.