विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी हिंदु जनजागृती समिती, विजयदुर्ग ग्रामविकास समिती आणि पुरातत्व खात्याचे अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी
देवगड (जि. सिंधुदुर्ग), ७ जानेवारी (वार्ता.) – विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी काही निधी पुरातत्व विभागाकडे वर्ग करण्याची आवश्यकता आहे; मात्र हा निधी कशा प्रकारे द्यायचा, याविषयी खात्याशी चर्चा करण्यात येईल. याविषयी लवकरच धोरण ठरवण्यात येईल, तसेच हिंदु जनजागृती समिती आणि विजयदुर्ग ग्रामविकास समिती यांच्या शिष्टमंडळाशी विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाविषयी चर्चा करणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.
हिंदु जनजागृती समितीने गडकोट रक्षण आणि संवर्धन मोहिमेच्या अंतर्गत विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. ७ जानेवारी या दिवशी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांच्यासह विजयदुर्ग किल्ल्याची पहाणी केली. त्या वेळी हिंदु जनजागृती समिती आणि विजयदुर्ग ग्रामविकास समिती यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. या वेळी हिंदु जनजागृती समितीने किल्ल्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाची प्रत के. मंजुलक्ष्मी यांना दाखवली.
‘पुरातत्व विभाग, स्वतः जिल्हाधिकारी, हिंदु जनजागृती समिती आणि विजयदुर्ग ग्रामविकास समिती यांची एक बैठक घेतली, तर त्यामध्ये नेमकेपणाने कशा प्रकारे किल्ल्याचे संवर्धन करू शकतो, याविषयी सविस्तर चर्चा करता येईल’, अशी विनंती जिल्हाधिकार्यांना करण्यात आली. त्या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘येथे झालेल्या माझ्या भाषणामध्ये मी हा विषय घेतला होता. तरीदेखील आपण ओरोस येथे याविषयी सविस्तर चर्चा करूया. पुरातत्व विभागाला आवश्यक तो निधी कशा प्रकारे वर्ग करता येईल, त्याविषयीसुद्धा आपण त्यांच्याशी चर्चा करूया. जेणेकरून त्यांना निधीची कमतरता भासणार नाही. आज माझ्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुरातत्व खात्याचे अधिकारी आहेत, त्यांच्यासह आम्ही किल्ल्याची पहाणी करत आहोत.’’
♦ हे पण वाचा –
विजयदुर्ग किल्ल्याचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यांसाठी स्थानिक ग्रामस्थांची निदर्शने
https://sanatanprabhat.org/marathi/539879.html
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री आनंद मोंडकर, डॉ. रविकांत नारकर, अशोक करंगुटकर आणि अनिरुद्ध दहिबावकर, तर ग्रामविकास मंडळाचे सल्लागार श्री. राजेंद्र परुळेकर, गिर्येचे सरपंच राजेंद्र गिरकर, विजयदुर्गचे सरपंच श्री. प्रसाद देवधर उपस्थित होते.